Tata Group Stocks: टाटा समूहाच्या शेअरमध्ये मंगळवारी प्रचंड वाढ झाली. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर १२ टक्क्यांनी वधारून ७,३०५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. याशिवाय टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्सचे शेअरही १ टक्क्यांनी वधारले. यामागे एक मोठं कारण आहे. टाटा समूहाची फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रान्च असलेल्या टाटा कॅपिटलचा पुढील वर्षी १५,००० कोटी रुपयांचा मेगा आयपीओ येण्याची शक्यता आहे. टाटा समूहानं यावर काम सुरू केलंय.
काय आहेत डिटेल्स?
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहानं टाटा कॅपिटलचा आयपीओ लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीच्या आयपीओची साईज १५,०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असं सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी शेअर विक्रीचा समावेश असेल. सिरिल अमरचंद मंगलदास आणि कोटक महिंद्रा कॅपिटल यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य गुंतवणूक बँकांचा ही समावेश करण्याबाबत लवकरच बोलणी केली जातील, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय. टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सचा ९२.८३ टक्के हिस्सा असून बहुतांश शेअर्स टाटा समूहातील इतर कंपन्या आणि ट्रस्टच्या मालकीचे आहेत.
आरबीआयचा मोठा निर्णय
रिझर्व्ह बँकेनं अधिसूचित केल्यापासून तीन वर्षांच्या आत म्हणजेच सप्टेंबर २०२५ पर्यंत 'अप्पर लेअर' एनबीएफसीची लिस्ट करणं बंधनकारक केलं आहे. टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस (जानेवारी २०२४ मध्ये टाटा कॅपिटलमध्ये विलीन झालेली) नियामक यादीत आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी आरबीआयनं एनबीएफसीसाठी स्केल बेस्ड रेग्युलेशन अंतर्गत अप्पर लेअर १६ एनबीएफसीची यादी जाहीर केली. फ्रेमवर्कमध्ये एनबीएफसीचे बेस लेयर (एनबीएफसी-बीएल), मिडल लेयर (एनबीएफसी-एमएल), अप्पर लेयर (एनबीएफसी-यूएल) आणि टॉप लेयर (एनबीएफसी-टीएल) असं वर्गीकरण करण्यात आले आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)