Tata Capital IPO: टाटा कॅपिटल लिमिटेडचा बहुप्रतिक्षित आयपीओ, जो २०२५ चा सर्वात मोठा देशांतर्गत इश्यू असण्याची अपेक्षा आहे, तो १३ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. २०२५ च्या सर्वात मोठ्या आयपीओची शेअर बाजारात सुस्त एन्ट्री झाली. टाटा ग्रुपच्या या कंपनीचे शेअर्स केवळ १% प्रीमियमवर लिस्ट झाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बीएसई आणि एनएसई दोन्हीवर शेअरचा भाव ₹३३० वर उघडला.
टाटा कॅपिटलच्या शेअर्सच्या लिस्टिंगपूर्वीच, विश्लेषकांनी भाकीत केले होते की आयपीओची सुरुवात फारशी उत्साही होणार नाही, परंतु तो माफक प्रमाणात वाढून किंवा फ्लॅट ओपनिंगसह उघडू शकतो. लिस्टिंगपूर्वी, अनलिस्टेड मार्केट किंवा ग्रे मार्केटमध्ये टाटा कॅपिटलच्या शेअर्सवरील प्रीमियम शून्य रुपये होता, जे स्पष्टपणे दर्शवतं की गुंतवणूकदारांना लगेच मोठा नफा मिळण्याची शक्यता कमी आहे. सॅमको सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिसिस्ट राज गायकर म्हणाले की, टाटा ब्रँडची विश्वासार्हता असूनही, बाजारातील सेंटिमेंट्स सध्या थंड आहे आणि शॉर्ट टर्म इनव्हेस्टर्स लिस्टिंगनंतर नफा बुक करू शकतात.
ह्युंदाईनंतरचा दुसरा मोठा आयपीओ
कंपनीनं एकूण १५,५१२ कोटी रुपयांच्या IPO द्वारे भांडवल गोळा केलं. हा गेल्या वर्षीच्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या २७,८७० कोटी रुपयांच्या इश्यूनंतरचा दुसरा सर्वात मोठा ऑफर आहे. हा इश्यू ३१० ते ३२६ रुपये प्रति शेअरच्या प्राइस बँडमध्ये जारी झाला होता. विशेष म्हणजे, या IPO ला केवळ १.९५ पट सबस्क्रिप्शन मिळालं, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह फारसा नव्हता हे स्पष्ट होते.
काय म्हणाले एक्सपर्ट?
एसपी तुलसियान इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सच्या विश्लेषक गीतांजली केडिया यांनी यापूर्वीच गुंतवणूकदारांना या IPO पासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी पुन्हा सांगितलं की, जर कोणाला लिस्टिंगच्या दिवशी माफक नफा मिळाला, तर तो त्वरित बुक करून घ्यावा, अन्यथा शेअरला दीर्घ कालावधीसाठी होल्ड करावं लागू शकतं.
दरम्यान, काही बाजार तज्ज्ञांचं मत आहे की टाटा कॅपिटलसारख्या एनबीएफसी क्षेत्रातील मजबूत खेळाडूच्या शेअरमध्ये दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. राज गायकर यांचं म्हणणे आहे की कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि स्थिर कामगिरी कायम ठेवल्यास हा शेअर येणाऱ्या वर्षांमध्ये चांगला परतावा देऊ शकतो. त्यांनी नवीन गुंतवणूकदारांना सल्ला दिला की त्यांनी घाई करू नये आणि स्टॉक स्थिर होण्याची वाट पहावी.
केडिया यांनी देखील, ज्या गुंतवणूकदारांना BFSI क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, ते टाटा कॅपिटलऐवजी इतर चांगले पर्याय शोधू शकतात असं म्हटलंय. कंपनीची दीर्घकालीन क्षमता याला एक मजबूत गुंतवणुकीचा पर्याय बनवू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)