Swiggy Share Crash: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचे (Swiggy) शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. बाजार उघडताच कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३८७ रुपयांवर आला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. कंपनीच्या शेअर्समधील या घसरणीमागील कारण डिसेंबर तिमाहीचे खराब निकाल आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीचा तोटा सुमारे ८०० कोटी रुपये आहे. यामुळेच गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली असून बाजार उघडताच शेअरमध्ये जोरदार विक्री दिसून आली.
डिसेंबर तिमाही निकाल
ऑनलाइन फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी स्विगीचा निव्वळ तोटा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत वाढून ७९९.०८ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५७४.३८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. कंपनीच्या तोट्यात वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्विगीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एकूण खर्च ३,७०० कोटी रुपयांवरून ४,८९८.२७ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्नही या तिमाहीत ३,०४८.६९ कोटी रुपयांवरून ३,९९३.०६ कोटी रुपयांवर पोहोचले.
काय म्हणाली कंपनी?
स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीहर्ष मजेती यांनी 'सणासुदीच्या तिमाहीत ग्राहकांना विशेष ऑफर देण्यावर आमचा भर आहे, ज्यामुळे ग्राहक अधिकाधिक वापर करू शकतील, असा आम्हाला विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
नोव्हेंबरमध्ये आलेला आयपीओ
१३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्विगी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. स्विगीचे शेअर्स आयपीओच्या किमतीच्या ८% प्रीमियमवर लिस्ट झाले होते. त्याचा आयपीओचा भाव ३९० रुपये होता. एनएसईवर कंपनीचा शेअर ४२० रुपयांवर लिस्ट झाला होता. बीएसईवर हा शेअर ५.६४ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४१२ रुपयांवर लिस्ट झालेला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)