Sundrex Oil Company Listing: सनड्रेक्स ऑईल कंपनीचे शेअर्स मंगळवारी बाजार उघडताच मोठ्या घसरणीसह लिस्ट झाले आहेत. कंपनीचा शेअर ८६ रुपयांच्या मूळ किमतीच्या तुलनेत २० टक्के घसरणीसह ६८.८० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतरही ही घसरण थांबली नाही आणि शेअर आणखी ५ टक्क्यांनी घसरून ६५.४० रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे सनड्रेक्स ऑईल कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी एकूण २४ टक्क्यांनी कोसळला असून, यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या आयपीओचा एकूण आकार ३२ कोटी रुपये इतका होता.
किती करावी लागलेली गुंतवणूक?
सनड्रेक्स ऑईल कंपनीच्या आयपीओला (Sundrex Oil IPO) गुंतवणूकदारांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. हा आयपीओ एकूण १.५३ पट सबस्क्राइब झाला होता. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १.९० पट, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (NII) श्रेणीत १.०१ पट बोली लागली. तसंच पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIB) श्रेणीत केवळ १ पट सबस्क्रिप्शन मिळालं. या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २ लॉटसाठी बोली लावण्याची मर्यादा होती, ज्यामध्ये ३२०० शेअर्सचा समावेश होता. यासाठी गुंतवणूकदारांना २,७५,२०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती.
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
कंपनीचा व्यवसाय आणि उत्पादनं
२०१० मध्ये स्थापन झालेली सनड्रेक्स ऑईल कंपनी लिमिटेड ही हाय-परफॉर्मन्स इंडस्ट्रियल आणि ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट्स, ग्रीस आणि स्पेशालिटी उत्पादनांची उत्पादक आणि घाऊक विक्रेता आहे. कंपनी भारत आणि शेजारील देशांमधील उद्योगांना आपल्या सेवा पुरवते. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स, ऑटोमोटिव्ह लुब्रिकंट्स आणि विविध स्पेशालिटी उत्पादनांचा समावेश आहे. कंपनी स्वतःच्या ब्रँड अंतर्गत उत्पादनं तयार करण्यासोबतच 'कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग' सेवा देखील देते, ज्यामध्ये टोल ब्लेंडिंग आणि कॉन्ट्रॅक्ट पॅकेजिंगचा समावेश आहे.
कोण आहेत प्रमोटर्स?
सनड्रेक्स ऑईल कंपनीचा आयपीओ २२ डिसेंबर २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि २४ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होता. महेश सोंथालिया, शशांक सोंथालिया आणि अमन सोंथालिया हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. आयपीओपूर्वी कंपनीत प्रमोटर्सची १०० टक्के भागीदारी होती, जी आता ७२ टक्क्यांवर आली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
