Stock Markets Today: शेअर बाजाराची मंगळवारी जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २९३ अंकांनी वधारून ७५,६५९ वर खुला झाला. निफ्टी १३१ अंकांनी वधारून २२,९६० वर उघडला. बँक निफ्टी ५७८ अंकांनी वधारून ४८,६४२ वर उघडला. करन्सी बाजारात रुपया १६ पैशांनी घसरून ८६.५०/डॉलरवर पोहोचला.
केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे आज बाजारात चांगलीच खळबळ उडाली. सिस्टमध्ये रोकड वाढवण्यासाठी आरबीआयकडून आणखी एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय. ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या माध्यमातून ६० हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत तीन टप्प्यांत ही खरेदी होणार आहे.
निफ्टीवर श्रीराम फायनान्स, अॅक्सिस बँक, विप्रो, एचडीएफसी बँक, ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. त्याचवेळी फार्मा शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली. सन फार्मा, डॉ. रेड्डी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
जागतिक बाजारातील अपडेट्स
कालच्या कमकुवत सुरुवातीनंतर डाऊ जवळपास ३०० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. एआय शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे झालेल्या गोंधळात नॅसडॅक ६०० अंकांनी घसरला होता. आज सकाळी गिफ्ट निफ्टी जवळपास ७५ अंकांनी वधारून २२,९२५ वर होता. डाऊ फ्युचर्स जवळपास ५० अंकांनी घसरले होते. निक्केई ३०० अंकांनी घसरला. चीनच्या बाजारपेठा ४ फेब्रुवारीपर्यंत बंद आहेत. कोरिया आणि तैवानमधील बाजारपेठाही आज बंद आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या आणि दोन दिवस चालणाऱ्या अमेरिकन फेडच्या बैठकीकडेही जागतिक बाजारांचं लक्ष असणार आहे. उद्या रात्री उशिरा व्याजदरांबाबत निर्णय होईल.