Stock Markets Today: शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात जोरदार तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स ३४० अंकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारून २६,००० च्या वर उघडला. आयटी इंडेक्समध्ये १ टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स २१६ अंकांच्या वाढीसह ८५,१४५ वर उघडला, तर निफ्टी ८९ अंकांच्या वाढीसह २६,०५५ वर उघडला. बँक निफ्टी १५५ अंकांनी वधारून ५९,२२४ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया २७ पैशांनी कमकुवत होऊन ८९.५४/डॉलर्स वर उघडला.
मेटल, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल, ऑटो आणि NBFC क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी दिसून आली. निफ्टी ५० मध्ये श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, हिंदाल्को, टाटा स्टील, विप्रो, टेक महिंद्रा आणि ग्रासिम या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली, तर केवळ एसबीआय लाईफ, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
विदेशी, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा
शेअर बाजारात नव्या आठवड्याची सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी वातावरण मजबूत दिसत आहे. शुक्रवारी विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली सातत्यपूर्ण खरेदी, अमेरिकन टेक शेअर्समधील तेजी आणि कमोडिटी मार्केटमधील विक्रमी स्तर यांमुळे बाजारातील सकारात्मकतेला बळ मिळालं आहे. त्याचबरोबर इन्फोसिसच्या एडीआरमध्ये झालेल्या असामान्य हालचाली हा देखील बाजारात चर्चेचा मोठा विषय ठरला आहे.
संस्थागत गुंतवणूकदारांची दमदार खरेदी
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) कॅश मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आपली खरेदी सुरू ठेवली आहे. शुक्रवारी FIIs ने कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून सुमारे ६,७४४ कोटी रुपयांची खरेदी केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा (DIIs) विश्वासही कायम असून त्यांनी विक्रमी ८० व्या दिवशी बाजारात सुमारे ५,७०० कोटी रुपये गुंतवले आहेत. हा मजबूत ओघ बाजारासाठी एक मोठा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
