Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी मंथली एक्सपायरी संपत असून केंद्रीय अर्थसंकल्पाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आज बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ओपनिंगमध्ये बेंचमार्क निर्देशांक संमिश्र व्यवहार करताना दिसले.
सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात फ्लॅट झाली आणि तो रेड ग्रीनझोनमध्ये दिसला. प्रारंभी सेन्सेक्स ८४ अंकांनी घसरून ७६,४४८ च्या पातळीवर होता. निफ्टी १० अंकांनी घसरून २३,१५३ च्या पातळीवर होता. बँक निफ्टी ८९ अंकांच्या घसरणीसह ४९,०७६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक १५५ अंकांनी वधारून ५२,८७४ वर आला.
यामध्ये सर्वाधिक घसरण / तेजी
टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक घसरले. अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांमुळे टाटा मोटर्स सुमारे ८ टक्क्यांनी घसरून ६९५ च्या पातळीवर आला. तर बजाज फायनान्स जवळपास ४ टक्क्यांच्या तेजीसह निफ्टीत सर्वाधिक वधारला. बजाज फिनसर्व्ह, हिंडाल्को, इंडसइंड बँक, एनटीपीसी यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले.
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत
सकाळी जागतिक बाजारातूनही संमिश्र संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी फ्लॅट होता आणि प्री-ओपनिंगमध्ये बाजार फ्लॅट उघडण्याची चिन्हे होती. काल अमेरिकन फेडनं सलग तीन वेळा व्याजदर कपातीनंतर आता व्याजदर कायम ठेवले. फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी महागाई अजूनही उद्दिष्टापेक्षा जास्त आहे, त्यामुळे व्याजदर कपातीची घाई नसल्याचं म्हटलं. फेडच्या धोरणानंतर अमेरिकी बाजार घसरणीवर बंद झाले. डाऊ सुमारे १५० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १५० अंकांच्या सुधारणेनंतर १०० अंकांनी घसरून बंद झाला. गिफ्ट निफ्टी २३१५० च्या खाली फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स १०० अंकांनी वधारले होते. चीन, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील बाजारपेठा आजही बंद आहेत.