April Month Share Market Holidays: २०२५ मध्ये शेअर बाजारात एकूण १४ दिवस सुट्टी असणार आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात केवळ तीन सुट्ट्या येत असून, त्यात दोन लाँग वीकेंडचा समावेश आहे. त्यामुळे ट्रेडर्सना या महिन्यात कामासाठी कमी वेळ मिळेल. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच शेअर बाजाराशी संबंधित लोकांना या सुट्ट्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय ट्रेड करू शकतील.
एप्रिलमध्ये शेअर बाजार ३ दिवस बंद
१० एप्रिल रोजी श्री महावीर जयंती, त्यानंतर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये कोणतंही कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत या दिवशी सार्वजनिक सुट्टीही असणार आहे. तर १८ एप्रिल ला गुड फ्रायडे येत आहे. अशा तऱ्हेनं या दिवसांतही शेअर बाजारात काम होणार नाही.
सलग दोन लाँग वीकेंड
१४ एप्रिलची सुट्टी सोमवारी येत आहे, तर १२ आणि १३ एप्रिल ला साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. तर १८ एप्रिल ला गुड फ्रायडे असल्यानं सुट्टी आहे, त्यानंतर १९ एप्रिलला शनिवार आणि २० एप्रिलला रविवारची सुट्टी आहे. यावेळी पुन्हा तीन दिवस सुट्टी असणार आहे.
आगामी सुट्ट्यांची यादी
१५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे, तर २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमित्त नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई शेअर बाजार बंद राहतील. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसरा, २१-२२ ऑक्टोबरला दिवाळी, ५ नोव्हेंबरला प्रकाश गुरुपर्व आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या निमित्तानं शेअर बाजारात सुट्टी असेल.