Share Market : शेअर बाजारातील आजचा व्यवहार एखाद्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या क्रिकेट सामन्यासारखा झाला. सकाळी बाजारात दिसलेली कमजोरी आणि त्यानंतर आलेली खरेदी या हिंदोळ्यांनंतर बाजार अखेर जिथून सुरू झाला होता, तिथेच स्थिरावला. सेन्सेक्स २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८२,२४९ वर बंद झाला, तर निफ्टीने नाममात्र वाढीसह २५,४९७ वर विश्रांती घेतली.
दिग्गजांनी सावरली बाजू
आज इंडेक्सला आधार देण्याचे काम मोठ्या समभागांनी केले. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, स्टेट बँक आणि आयशर मोटर्स यांसारख्या दिग्गज शेअर्सनी निफ्टीला खालच्या स्तरावरून सावरले. यामुळे बाजार जरी वाढला नाही, तरी मोठ्या घसरणीपासून बचाव झाला.
मिडकॅप आणि डिफेन्समध्ये 'बुलेट' वेगाने तेजी
खऱ्या अर्थाने आजची चमक ब्रॉडर मार्केटमध्ये, विशेषतः मिडकॅप शेअर्समध्ये पाहायला मिळाली. मिडकॅप इंडेक्स सुमारे ३९२ अंकांनी वधारला, जो बाजारातील अंतर्गत मजबूतीचा संकेत मानला जातो.
क्षेत्रनिहाय घडामोडी
- डिफेन्स सेक्टर: भारत-इस्राईल संरक्षण कराराच्या चर्चेने या क्षेत्रातील शेअर्सना पंख फुटले. यात 'डेटा पॅटर्न' ६ टक्क्यांनी वधारला.
- तेजस नेटवर्क्स : एका मोठ्या ५जी ऑर्डरच्या वृत्ताने या शेअरमध्ये १७ टक्क्यांची तुफानी वाढ झाली.
- ऑटो सेक्टर : मजबूत रजिस्ट्रेशन ग्रोथमुळे टाटा मोटर्सचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून निफ्टीचा 'टॉप गेनर' ठरला.
- फार्मा सेक्टर : मॅनकाइंड फार्मामध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली (१२% वाढ), तर सा नोफी इंडियाचा शेअर निकालांनंतर ३ टक्क्यांनी घसरला.
वाचा - AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
सावधगिरीचा इशारा
बाजार तज्ज्ञांच्या मते, निफ्टीच्या तांत्रिक आलेखावर अद्यापही काही प्रमाणात कमजोरी दिसत आहे. निफ्टी २१-ईएमएच्या वर टिकण्यास अपयशी ठरत असून आरएसआय मध्येही कमजोरी आहे. वरच्या बाजूला २५,५५० ते २५,६०० हे स्तर महत्त्वाचा अडथळा ठरू शकतात. खालील बाजूला २५,३०० चा स्तर निफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
