Stock Market Update : जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेत आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळण्याच्या आशेने भारतीय शेअर बाजारात आज 'दिवाळी' साजरी झाली. सकाळपासूनच खरेदीचा धडाका लावणाऱ्या गुंतवणूकदारांमुळेनिफ्टी-५० निर्देशांक दिवसाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. निफ्टीने सुमारे २.२५% म्हणजेच ५१६ अंकांची जोरदार झेप घेत २३,४२९ चा स्तर गाठला. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
तेजीची ५ प्रमुख कारणे
शेअर बाजारातील या उसळीमागे जागतिक आणि तांत्रिक अशी पाच मोठी कारणे आहेत.
- सकारात्मक जागतिक संकेत : आशियाई बाजारपेठांमध्ये आज सुमारे १.४% ची तेजी पाहायला मिळाली. यामुळे भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा (FPI) आत्मविश्वास वाढला.
- ट्रम्प यांचा '१५-पॉइंट प्लॅन' : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमध्ये १५ कलमी कार्यक्रमावर चर्चा होत असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भूराजकीय तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- कच्च्या तेलाची 'शंभरी' खाली घसरण : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरले आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे भारतातील महागाईचा दबाव कमी होईल, हा कयास बाजारासाठी 'बूस्टर डोस' ठरला आहे.
- पुरवठा साखळीतील अडथळे दूर : जर युद्धविराम झाला, तर जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी पुन्हा पूर्ववत होईल. याचा थेट फायदा कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईवर दिसून येईल.
- तांत्रिक मजबुती : जिओजित इन्व्हेस्टमेंटच्या मते, बाजार आता 'अपट्रेंड' मध्ये आहे. निफ्टीसाठी २३,३५० ते २३,८०० पर्यंतचे उद्दिष्ट दिसत असून, २२,८८० वर भक्कम खरेदीचा आधार आहे. जोपर्यंत बाजार २२,६४० च्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल कायम राहील.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
"बाजार सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे, तरीही उच्च स्तरावर गुंतवणूकदारांनी थोडी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नफा वसुलीची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जेरोधासारख्या ब्रोकर्सनी वाढवलेले शुल्क आणि १ एप्रिलपासून लागू होणारा 'STT' कर पाहता, ट्रेडर्सनी आपले स्टॉप लॉस कडक ठेवणे हिताचे ठरेल.
