Stock Market Today: शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. सेन्सेक्स २०० अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टी सुमारे ७० अंकांच्या वाढीसह २५,०७५ च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्ये थोडीशी वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही खरेदी दिसून आली. बाजारात ६५% तेजीचा कल दिसून येत होता. आज आयटी निर्देशांकात खरेदी दिसून आली. याशिवाय, फार्मा आणि रियल्टी निर्देशांकातूनही बाजाराला पाठिंबा मिळत होता.
निफ्टी ५० वर इन्फोसिसचा शेअर सर्वाधिक वधारला, शेअर बायबॅकमुळे त्यात २% ची वाढ झाली. याशिवाय हिंडाल्को, टाटा मोटर्स, मारुती, आयशर मोटर्स, अॅक्सिस बँक हे देखील सर्वाधिक वाढणाऱ्यांमध्ये होते. एचयूएल, नेस्ले, एचडीएफसी बँक, इटर्नल, एसबीआय, आयटीसी घसरले. म्हणजेच, एफएमसीजी निर्देशांकात अधिक घसरण दिसून आली.
मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स २१० अंकांनी वाढून ८१,७५८ वर उघडला. निफ्टी ६९ अंकांनी वाढून २५,०७४ वर आणि बँक निफ्टी ११२ अंकांनी वाढून ५४,७८१ वर उघडला. चलन बाजारात, रुपया ५ पैशांनी मजबूत होऊन ८८.३९/ डॉलर्सवर उघडला.
अमेरिकेकडून निमंत्रण, चर्चेला वेग
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात पीयूष गोयल यांना अमेरिकेला आमंत्रित केलं आहे. गोर यांनी असेही म्हटलंय की, "व्यापार करार फार दूर नाही, जो दोन्ही बाजू या कराराला लवकरात लवकर अंतिम रूप देण्यास उत्सुक आहेत याचा पुरावा आहे." पीयूष गोयल यांनी देखील पुष्टी केलीये की दोन्ही देशांमधील चर्चा अतिशय चांगल्या वातावरणात सुरू आहे आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीवर दोन्ही बाजू समाधानी आहेत.