Stock Market Today: टॅरिफ वॉरमध्ये ट्रम्प यांनी मोठा यू-टर्न घेतल्यानं देशांतर्गत शेअर बाजाराला दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. निफ्टी ३५० अंकांनी वधारला आणि २२,७६० च्या आसपास व्यवहार करत होता. सेन्सेक्स ११०० अंकांच्या वाढीसह ७५,००० च्या जवळ होता. बँक निफ्टी तब्बल ७०० अंकांनी वधारून ५१,००० च्या जवळपास होता. बाजारात ९२ टक्के बुलिश दिसत होता. स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे २०० अंकांनी वधारला. निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास ४०० अंकांनी वधारला.
निफ्टी ५० वर सिप्ला, टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील, हिंदाल्को या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर निफ्टीमध्ये फक्त टीसीएस आणि एशियन पेंटचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ९८८ अंकांनी वधारून ७४,८३५ वर उघडला. निफ्टी २९६ अंकांनी वधारून २२,६९५ वर उघडला. बँक निफ्टी ३९४ अंकांनी वधारून ५०,६३४ वर तर, चलन बाजारात रुपया ४५ पैशांनी मजबूत होऊन ८६.२४/डॉलरवर उघडला. ट्रम्प यांनी काल भारतासह जवळपास सर्वच देशांवरील टॅरिफ पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. केवळ १० टक्के बेस टॅरिफ लागू राहणार आहे. पण चीनच्या प्रत्युत्तरात्मक टॅरिफमुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी यावरील शुल्क वाढवून १२५ टक्के केल्यानं चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध अधिक चव्हाट्यावर आले आहे. आता एकूण दर १४५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
... म्हणून तेजी
ट्रम्प यांनी शुल्काबाबत घेतलेल्या यू-टर्नमुळे बुधवारी अमेरिकी बाजारात ८ ते १२ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ दिसून आली. कालच्या जोरदार नफा वसुलीनंतरही डाऊनं दोन दिवसांत १९५० अंकांची झेप घेतली, तर नॅसडॅकनं ११०० अंकांची मोठी झेप नोंदवली. अशा तऱ्हेनं आज सकाळी गिफ्ट निफ्टी ४५० अंकांनी वधारून २२,९०० वर पोहोचला. पण याउलट डाऊ फ्युचर्स ३५० अंकांनी घसरला, तर निक्केई १७०० अंकांनी घसरला.