Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी (२० मार्च) तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास ४०० अंकांनी वधारून ७५,८०० च्या आसपास उघडला. निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह २३,०१० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी जवळपास ३०० अंकांनी वधारून ४९,९९० वर खुला झाला. तर इंट्राडेमध्ये बँक निफ्टी ५० हजारांच्या वर गेला. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ४६८ अंकांनी वधारून ७५,९१७ वर उघडला. निफ्टी १२९ अंकांनी वधारून २३,०३६ वर उघडला. बँक निफ्टी २४५ अंकांनी वधारून ४९,९४७ वर उघडला. चलन बाजारात रुपया ५ पैशांनी मजबूत होऊन ८६.३९/डॉलर वर पोहोचला.
कामकाजादरम्यान आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. ऑटो, पीएसयू बँक, मीडिया, रियल्टी निर्देशांकही वधारले. श्रीराम फायनान्स, विप्रो, हीरो मोटो, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक वधारले. तर सन फार्मा, एचडीएफसी लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, डॉ. रेड्डी यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
काल अमेरिकन फेडनं यावर्षी अर्धा टक्का व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले होते. अंदाजानुसार कोणताही बदल न करता व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते, परंतु टॅरिफ वॉरमुळे वाढीचा अंदाज कमी झाल्यानं महागाई वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन व्याजदर कपातीच्या अंदाजामुळे अमेरिकी बाजारात मोठी उसळी आली. डाऊ सुमारे ४०० अंकांनी वधारला, तर नॅसडॅकनं अडीचशे अंकांची झेप घेतली. आज सकाळी गिफ्ट निफ्टी जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २३०५० च्या वर होता. डाऊ फ्युचर्समध्येही १०० अंकांची वाढ झाली. जपानमधील बाजारपेठा आज बंद आहेत.