Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १६० अंकांनी वधारून ८०,६६१ वर उघडला. निफ्टी ७३ अंकांनी वधारून २४,४१९ वर पोहोचला. बँक निफ्टी ५० अंकांनी वधारून ५५,०६५ वर पोहोचला. तर, रुपया ८४.५८ च्या तुलनेत ८४.४५/डॉलरवर उघडला. आज टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून येत आहे. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो-आयटीपासून फार्मा आणि रियल्टीपर्यंतच्या निर्देशांकांमध्ये तेजी दिसून येत आहे.
आज कामकाजादरम्यान एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, टायटन, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. तर इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एल अँड टी, एसबीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
कच्च्या तेलाच्या किंमतीत ४ टक्क्यांची घसरण झाली असून ते आता ५९ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहेत. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही दिलासादायक बातमी आहे कारण महागाई आणि व्यापार तुटीवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली.
डाऊ जोन्स ५६४ अंकांनी वधारला आणि जागतिक भावना मजबूत झाल्या. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारांवरही दिसू शकतो. टाटा मोटर्ससाठी आनंदाची बातमी आहे, कारण जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) कंपनीनं अमेरिकेला निर्यात पुन्हा सुरू केली आहे. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होऊ शकते.