Share Market Today: निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह २५,६०० च्या आसपास व्यवहार करताना दिसला, तर बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये २०० अंकांची घसरण नोंदवण्यात आली. सकाळी ९:२६ च्या सुमारास सेन्सेक्स २४७ अंकांनी घसरून ८३,०३१ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ९८ अंकांच्या घसरणीसह २५,५८३ च्या पातळीवर होता. बँक निफ्टीमध्ये ३११ अंकांची घट होऊन तो ६०,६३७ वर पोहोचला आणि मिडकॅप निर्देशांकातही १४० अंकांची घसरण पाहायला मिळाली.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती आणि टॉप गेनर्स-लूझर्स
क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर व्यवहार करत होता. एफएमसीजी (FMCG), आयटी आणि पीएसयू बँक निर्देशांकात हलकी वाढ दिसून आली, मात्र मेटल निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरला. रियल्टी, एनबीएफसी आणि खाजगी बँक निर्देशांकातही घसरण दिसून आली.
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,४७८ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
निफ्टी ५० वर एशियन पेंट, बीईएल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडिगो आणि टीसीएस या शेअर्समध्ये तेजी होती. दुसरीकडे क्वालिटी वॉल्स, हिंदाल्को, इटर्नल, श्रीराम फायनान्स, मॅक्स हेल्थ, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील हे आजचे प्रमुख घसरलेले शेअर्स ठरले.
जागतिक संकेतांचा परिणाम
कालच्या तेजीनंतर आज निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीला जागतिक बाजार काहीसे सुस्त दिसत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये सकाळी घसरण दिसून आली असून तो ८० अंकांनी घसरून २५,६५० च्या खाली व्यवहार करताना दिसला. डाओ फ्युचर्स सपाट असून अमेरिकन बाजार काल बंद होते. आजच्या व्यवहारावर जागतिक संकेत, कमोडिटीची हालचाल आणि निवडक कॉर्पोरेट बातम्यांचा परिणाम होऊ शकतो. अमेरिकन टॅरिफची भीती, कच्च्या तेलाची चाल आणि परदेशी व देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओघ यांसारखे घटक बाजाराच्या मानसिकतेवर परिणाम करतील.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने १,१०० रुपयांनी घसरून १,५४,८०० रुपयांच्या खाली बंद झाले, तर चांदी ४,५०० रुपयांनी घसरुन २,४०,००० रुपयांच्या खाली आली आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणमधील चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी क्रूड ऑईलच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. तर ब्रेंट क्रूड १ टक्क्याने वधारून ६८ डॉलर्सच्या वर पोहोचलं. तेलातील या तेजीमुळे ऑईल मार्केटिंग कंपन्या आणि महागाईच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
