Stock Market Today: शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स ५३२ अंकांनी घसरून ७६,८८२ वर, निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३४१ वर, बँक निफ्टी ३८६ अंकांनी घसरून ५१,१७८ वर खुला झाला. दुसरीकडे सेक्टोरल इंडेक्सचा विचार केला तर मेटल इंडेक्समध्ये सर्वाधिक विक्री झाल्याचं दिसून आलं. आज एफएमसीजी आणि रियल्टी क्षेत्र वगळता सर्वत्र विक्री सुरू आहे. बाजारात अचानक झालेल्या या घसरणीमुळे पुन्हा एकदा रिकव्हरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
कामकाजादरम्यान इंडसइंड बँक, महिंद्रा, पॉवरग्रिड, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट्स या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, टिसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
शुक्रवारी एफआयआयनं रोख, निर्देशांक आणि शेअर फ्युचर्समध्ये जोरदार विक्री केल्यानं बाजारावर दबाव निर्माण झाला. गिफ्ट निफ्टी जवळपास २०० अंकांच्या घसरणीसह २३,४५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे, तर डाऊ फ्युचर्समध्येही १५० अंकांची घसरण दिसून आली.
व्होडाफोन आयडियाला दिलासा
व्होडाफोन आयडियाला स्पेक्ट्रम थकबाकी भरण्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीच्या स्पेक्ट्रम थकबाकीपैकी ३७,००० कोटी रुपये सरकार १० रुपये प्रति शेअर दरानं इक्विटीमध्ये रूपांतरित करणार आहे. यामुळे सरकारचा हिस्सा २२.६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर जाईल. सरकारनं आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) ६२,७०० कोटी रुपये खर्चून १५६ हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार असून, यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.