Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारासाठी सोमवारी (३ फेब्रुवारी) जागतिक बाजारातून अत्यंत कमकुवत संकेत मिळाले आणि मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,०६३ वर उघडला. निफ्टी १६३ अंकांनी घसरून २३,३१९ वर आणि बँक निफ्टी ४३२ अंकांनी घसरून ४९,०७४ वर उघडला. रुपया ८७.०४/डॉलरच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.
निफ्टी मिडकॅप जवळपास ९०० अंकांच्या घसरणीसह ५२,५९० च्या पातळीवर घडला. तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ३०० अंकांनी घसरून १६,६७५ वर खुला झाला. इंडिया व्हीआयएक्स ४ टक्क्यांहून अधिक वधारला. ग्राहकोपयोगी वस्तू आणि आरोग्य सेवा क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरले. सर्वात मोठी घसरण मेटल निर्देशांक, तसंच ऑईल अँड गॅस निर्देशांकात झाली. निफ्टी मिडस्मॉल आयटी अँड टेलिकॉम निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली.
निफ्टीवर हिंडाल्को, बीईएल, एलटी, टाटा स्टील, टाटा मोटर्स या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. तर मारुती, सन फार्मा, टायटन, आयशर मोटर्स, नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक वधारले.
टॅरिफ वॉरमुळे भीती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात मोठी भीती निर्माण झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीही २०० अंकांच्या मोठ्या घसरणीवर होता. निक्केईमध्येही ९०० अंकांची घसरण झाली. प्री-ओपनिंगमध्ये घसरण होऊन सुरुवात होण्याची चिन्हे होती. चलन बाजारात रुपयानं विक्रमी नीचांकी पातळी गाठली.
ग्लोबल मार्केट्सचे अपडेट्स
टॅरिफ वॉरमुळे डाऊ आणि नॅसडॅक फ्युचर्स ५०० अंकांनी घसरले. अमेरिकेनं चीनवर १० टक्के, तर मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के शुल्क लादलं आहे. त्या बदल्यात मेक्सिको आणि कॅनडानेही अमेरिकेवर २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. टॅरिफ वॉरच्या भीतीनं गिफ्ट निफ्टी २०० अंकांनी घसरून २३,३५० वर आला. जपानचा बाजार निक्केई जवळपास ९०० अंकांनी घसरला, तर चीनचा बाजार आज बंद आहे.