Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात आज निफ्टीची मंथली एक्सपायरी २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्तानं शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स २२० अंकांनी वधारला होता. निफ्टीही जवळपास ६० अंकांनी वधारला. बँक निफ्टीही २०० अंकांनी वधारला. मिडकॅप निर्देशांकात
किंचित वाढ झाली. परंतु सर्वात मोठी तेजी एनबीएफसी शेअर्समध्ये दिसून आली. आरबीआयकडून बँका आणि एनबीएफसीला मोठा दिलासा मिळाला आहे, या बातमीमुळे या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. एनबीएफसींना देण्यात येणाऱ्या बँक कर्जावरील २५ टक्के अतिरिक्त जोखीम वेटेज काढून टाकण्यात आलंय. हे नवे नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
गुरुवारी कामकाजादरम्यान श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, हिंडाल्को या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक वधारले. तर अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, ट्रेंट, एनटीपीसी, हीरो मोटो या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.
मागील बंद पाहिला तर सेन्सेक्स १०४ अंकांनी वधारून ७४,७०६ वर उघडला. निफ्टी २१ अंकांनी वधारून २२,५६८ वर आणि बँक निफ्टी १२४ अंकांनी वधारून ४८,७३२ वर उघडला. चलन बाजारात रुपया ४ पैशांनी घसरून ८७.२५/ डॉलरवर खुला झाला. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी मेटल, निफ्टी प्रायव्हेट बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. पण याउलट कन्झ्युमर ड्युरेबल्स, रियल्टी आणि मीडिया निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली.
कच्च्या तेलाचा भाव घसरला
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होण्याच्या शक्यतेमुळे कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव अडीच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ७२ डॉलरवर घसरला. ३ दिवसांच्या घसरणीनंतर सोनं १५ डॉलर्सनं वाढून २९३० डॉलर वर तर चांदी दीड टक्क्यांनी वाढून ३२ डॉलरवर पोहोचली. सोन्याचा भाव २५० रुपयांनी वाढून ८५,९०० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा भाव ९०० रुपयांनी वाढून ९४,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.