Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी कामकाजाच्या सुरुवातीला घसरण पाहायला मिळाली. कालच्या प्रॉफिट बुकिंगनंतर बाजारात काहीशी मंदावलेली भावना दिसून येत होती. मात्र त्यानंतर त्यात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्स १५३ अंकांच्या तेजीसह ७७४४२, तर निफ्टी सुमारे ४४ अंकांच्या तेजीसह २३,५३० च्या वर व्यवहार करत होता.
कामकाजाच्या सुरुवातीला ऑटो शेअर्सना फटका बसला. टाटा मोटर्स, सोना बीएलडब्ल्यू, संवर्धन मदरसन आणि या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. ऑटो इंडेक्समध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत होती. याशिवाय फार्मा, रियल्टी, एफएमसीजी मध्येही घसरणीसह व्यवहार होताना दिसला. एनबीएफसी, ऑइल अँड गॅस शेअर्स, पीएसयू बँक, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये तेजी होती.
अमेरिकेतील वाहन क्षेत्रावरील शुल्काच्या कालच्या घोषणेमुळे बाजारावर पुन्हा दबाव दिसत आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात आधीच नफावसुली दिसून आली होती आणि आज मंथली एक्सपायरी संपत असल्यानं बाजारात काही प्रमाणात अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसं पाहिलं तर काल बाजारात घसरण होऊनही एफआयआयने ४१५० कोटींहून अधिक निव्वळ खरेदी केली होती. सलग आठव्या दिवशी कॅश आणि फ्युचर्समध्ये खरेदी सुरूच होती.
काल वाहन क्षेत्रावरील शुल्काची घोषणा होण्यापूर्वीच अमेरिकी बाजारात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या तेजीनंतर डाऊ १५० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक ३७५ अंकांनी घसरून बंद झाला. गिफ्ट निफ्टी २५ अंकांनी घसरून २३५०० च्या जवळ होता. वाहन क्षेत्रावरील शुल्काच्या घोषणेनंतर डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी घसरले, तर निक्केईसह आशियाई बाजारात घसरण झाली.