Stock Market Today: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आजच्या घसरणीमुळे निफ्टीमध्ये सलग पाचव्या दिवशी घट झाली आहे. निफ्टीसाठी सध्या २५,००० ची पातळी महत्त्वाची आहे. सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात १९० अंकांनी घसरून ८१,५२३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी ४० अंकांनी कमजोर होऊन २५,०१५ च्या जवळपास होता. तर, बँक निफ्टीही रेड झोनमध्ये होता आणि तो ८१ अंकांनी घसरून ५५,०४० च्या पातळीवर आला. मिडकॅप सिलेक्ट निर्देशांक मात्र सपाट व्यवहार करत होता.
आजही ऑटो इंडेक्समध्ये घसरण दिसून आली. पीएसयू बँक आणि एनबीएफसी निर्देशांकातही घसरण होती. दुसरीकडे, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये वाढ नोंदवली जात होती. निफ्टी ५० वर हिंदाल्को, बीईएल, नेस्ले, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा तेजीसह व्यवहार करत होते. तर, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, मारुती, टायटन, एसबीआयमध्ये घसरण होती.
महागड्या मूल्यांकनाबद्दल असलेल्या चिंतेमुळे वॉल स्ट्रीटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली, तर आशियाई बाजारातूनही संमिश्र संकेत मिळत होते.
अमेरिकन बाजार दबावात
डाऊ जोन्स दिवसाच्या उच्चांकावरून ३३० अंकांनी घसरून १७१ अंकांनी खाली बंद झाला. नॅसडॅक ७५ अंकांच्या घसरणीसह रेड झोनमध्ये राहिला. महागडं मूल्यांकन आणि व्याजदरांबद्दलच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांची धारणा कमजोर झाली.