Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सलग चार दिवस बाजारात तेजी दिसून येत होती. पण आज कमकुवत ओपनिंग झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी घसरला होता. निफ्टी ४० अंकांच्या घसरणीसह २३,१५० च्या आसपास सुरू होता. बँक निफ्टीमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक्सेंचरच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा परिणाम इन्फोसिस, एचसीएल टेक सारख्या शेअर्सवर दिसून आला.
निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर आयटी निर्देशांकासह मेटल, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये घसरण झाली. रियल्टी निर्देशांकात सर्वाधिक तेजी होती. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, बँक, फार्मा, मीडिया या निर्देशांकांमध्ये तेजी होती. बेंचमार्क निर्देशांक मागील बंदच्या तुलनेत घसरणीसह उघडले. सेन्सेक्स १९३ अंकांनी घसरून ७६,१५५ वर उघडला. निफ्टी २२ अंकांनी घसरून २३,१६८ वर उघडला. बँक निफ्टी १३५ अंकांनी घसरून ४९,९२७ वर उघडला. चलन बाजारात रुपया १४ पैशांनी मजबूत होऊन ८६.२३/डॉलरवर पोहोचला.
जागतिक बाजारातून सातत्याने स्थिर संकेत मिळत होते. अमेरिकी बाजारात किंचित घसरण झाली असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारातील घरणीला थोडासा ब्रेक लागा होता. काल एफआयआयने दमदार पुनरागमन केलं. काल त्यांनी कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्समध्ये ९,४०० कोटी रुपयांची मोठी खरेदी केली.
दुसरीकडे, कालच्या उलथापालथीदरम्यान अमेरिकी बाजार दिवसभराच्या उच्चांकी पातळीवरून घसरला. डाऊ १० अंकांनी घसरून टॉपपासून ३०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक जवळपास ६० अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टी २५ अंकांनी वधारून २३२२५ वर पोहोचला. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होता. कालच्या सुट्टीनंतर निक्केई १५० अंकांनी वधारला होता.