Stock Market Today: आज आठवड्याचे तिसरे व्यापारी सत्र असून बाजारातील घसरणीचं सत्र कायम आहे. आज सकाळी निफ्टी ८४ अंकांनी घसरून २५,६४८ वर, तर सेन्सेक्स २६९ अंकांनी घसरून ८३,३५८ वर उघडला. विशेष म्हणजे, मंगळवारी निफ्टी ५८ अंकांच्या घसरणीसह २५,७३२ वर बंद झाला होता. आयटी, ऑटो आणि रिअल्टी यांसारखे क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, मेटल्स, ऑइल अँड गॅस आणि पीएसयू बँक्स निर्देशांक हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्समधील टॉप-३० पैकी १० शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि २० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. एनटीपीसी (NTPC), भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये अर्धा ते एक टक्क्यांपर्यंत तेजी आहे. मात्र, एशियन पेंट्स, टीसीएस (TCS), बजाज फिनसर्व्ह आणि कोटक महिंद्रा बँक यांसारख्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली असून, हे शेअर्स एक ते दीड टक्क्यांपर्यंत खाली आलेत.
२५,९०० च्या वरच मिळेल रिव्हर्सल
एचडीएफसी (HDFC) सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राइम रिसर्च, देवर्ष वकील यांनी सांगितलं की, इराण-अमेरिका तणाव वाढल्यामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत तेजी आहे. ट्रम्प आणि फेड प्रमुख जेरोम पॉवेल समोरासमोर आले आहेत. मेटल्स आणि क्रूडमधील तेजीमुळे रुपयावर दबाव निर्माण झालाय. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FIIs) सातत्यपूर्ण विक्री रुपयावर दबाव वाढवण्याचे काम करत आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, निफ्टीमध्ये २५,९०० च्या पार गेल्यावरच 'रिव्हर्सल'ची अपेक्षा आहे, जे ५० DEMA लेव्हल आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीला २५,४७३ वर सपोर्ट आहे. दरम्यान, उद्या १५ जानेवारी रोजी शेअर बाजाराचं कामकाज बंद राहणारे.
