Stock Market Today: मंदीच्या भीतीनं जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी विक्री झाली, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आज त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स आज ३७२ अंकांनी घसरून ७३,७४३ वर उघडला. तर निफ्टी-५० हा ११५ अंकांनी घसरून २२,३४५ वर उघडला.
बँक निफ्टीमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. बँक निफ्टी ३४२ अंकांच्या घसरणीसह ४७,८७४ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. निफ्टी आयटी निर्देशांक १.५१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. तर मेटल निर्देशांकातही ०.८४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
कामकाजादरम्यान आयसीआयसीआय बँक, मारुती, सनफार्मा, नेस्ले इंडिया, आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टेक महिंद्रा, झोमॅटो, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
दरम्यान, डाऊ जोन्स ९०० अंकांनी घसरून चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला, तर नॅसडॅकनं अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली. नॅसडॅक ७५० अंकांनी घसरून सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. या परिणामामुळे आशियाई बाजारातही मोठी घसरण दिसून आली. याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला, जिथे गिफ्ट निफ्टी २०० अंकांनी घसरून २२,३०० च्या जवळ पोहोचला. डाऊ फ्युचर्समध्येही २०० अंकांची घसरण दिसून येत आहे, तर जपानचा निक्केई १००० अंकांनी घसरला.