सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर, परदेशी गुंतवणूकदारांच्या परतण्यामुळे आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स ३०० अंकांची वाढ नोंदवत व्यवहार करत होता. तर, निफ्टी ८० अंकांच्या वाढीसह २५,४०० च्या वर होता. बँक निफ्टी देखील ३०० अंकांची तेजी दाखवत ट्रेड करताना दिसला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही आज खरेदी दिसून आली.
निफ्टीवरील प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये (Private Bank Index) सर्वात जास्त खरेदी झाली. हा इंडेक्स १ टक्क्यांनी वधारला. आयटी क्षेत्रातील किरकोळ विक्री वगळता, जवळजवळ बाकीचे सर्व सेक्टरल इंडेक्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.
बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून २,५११ कोटी रुपयांची खरेदी केली, तर स्थानिक फंड्सनी सलग ३६ व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत ४,६५०कोटी रुपये बाजारात गुंतवले.
अमेरिकन बाजारात दिवसभराच्या मोठ्या चढ-उतारानंतर संमिश्र कल दिसून आला. डाऊ १७ अंक घसरून, तर नॅसडॅक १५० अंक वाढून बंद झाला. डाऊ दिवसाच्या उच्चांकावरून ४५० अंकांनी घसरला, तर टेक स्टॉक्समध्ये रिकव्हरी दिसली. सध्या गिफ्ट निफ्टी सुमारे ५० अंकांच्या वाढीसह २४,४५० च्या वर ट्रेड करत आहे. डाऊ फ्युचर्समध्येही किरकोळ वाढ आहे आणि आशियाई बाजारात निक्केई ३५० अंकांनी वर आहे.
सोन्या-चांदीनं रचला इतिहास
स्थानिक बाजारात सोन्यानं ₹१,२७,७४० चा नवा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर चांदी ₹२,८०० नं उसळी घेऊन ₹१,६२,५००च्या विक्रमी पातळीवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं पहिल्यांदा ४,२४० डॉलर्सच्या वर गेलं, तर चांदी सुमारे ४% नं उसळी घेऊन ५२.५ डॉलर्सच्या पुढे पोहोचली.