Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी, ४ नोव्हेंबर रोजी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरीच्या निमित्तानं सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६० अंकांनी, तर निफ्टी १० अंकांनी वर व्यवहार करत होते. मात्र, बँक निफ्टीमध्ये किंचित कमजोरी दिसून आली. बाजार उघडताना सेन्सेक्स २२ अंकांच्या वाढीसह ८४,००० वर, तर निफ्टी १९ अंकांच्या घसरणीसह २५,७४४ वर उघडला. दुसरीकडे, बँक निफ्टी १३५ अंकांनी खाली येत ५७,९६६ वर खुला झाला. चलन बाजारात रुपया ३७ पैशांनी मजबूत होऊन ८८.४१/ डॉलर्सवर उघडला.
बाजारात आज ऑटो, एफएमसीजी (FMCG) आणि आयटी (IT) या प्रमुख निर्देशांकांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. जसजसा दिवस पुढे सरकला, तसतशी घसरण इतर इंडेक्समध्येही वाढली. याउलट, फार्मा, मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्ससारखे इंडेक्स मात्र सुरुवातीची वाढ टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले.
निफ्टी ५० मधील प्रमुख शेअर्समध्ये भारती एअरटेल, टायटन, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ आणि अपोलो हॉस्पिटल मध्ये तेजी दिसून आली. या उलट, पॉवर ग्रिड, टाटा कंझ्यूमर, इटर्नल, आयशर मोटर्स, मारुती आणि बजाज ऑटो मध्ये घसरण नोंदवली गेली.
जागतिक आणि देशांतर्गत संमिश्र संकेत असल्याने आज भारतीय बाजाराची सुरुवात मर्यादित स्वरूपात झाली. विदेशी संकेतांबरोबरच कंपन्यांचे तिमाही निकाल आणि डॉलर इंडेक्सच्या हालचालींवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.
अमेरिकेतील बाजारांची कालची स्थिती
काल, अमेरिकन बाजारात डाऊ जोन्स २२६ अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १०९ अंकांनी वधारला. एस अँड पी ५०० (S&P 500) किरकोळ वाढीसह बंद झाला. टेक शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला, परंतु बँकिंग शेअर्सवर मात्र विक्रीचा दबाव कायम होता.
कमोडिटी बाजारातील घडामोडी
कमोडिटी बाजारात सोनं सुस्त असलं तरी चांदी मात्र कमकुवत झाली. क्रूड ऑईल $६५ प्रति बॅरलच्या आसपास स्थिर राहिले. एमसीएक्स (MCX) वर चांदी १७ ऑक्टोबरच्या विक्रमी उच्चांक ₹१,७०,४१५ वरून सुमारे ₹२३,००० खाली आहे. त्याचप्रमाणे, एमसीएक्स गोल्ड देखील त्याच कालावधीच्या विक्रमी उच्चांक ₹१,३२,२९४ वरून सुमारे ₹११,००० खाली व्यवहार करत आहे.
धातूंमध्ये तेजी दिसली, ॲल्युमिनियम $२,९०० च्या वर बंद झाला, जो मे २०२२ नंतरचा उच्चांक आहे. झिंक देखील डिसेंबर २०२४ नंतर प्रथमच $३,१०० च्या वर बंद झाला. नॅचरल गॅस वायदा $४.२ च्या वर जाऊन सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
