Stock Market Recovery : आज सकाळच्या सत्रात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे हाहाकार माजलेल्या दलाल स्ट्रीटवर दुपारनंतर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सकाळी १९०० हून अधिक अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स खालच्या पातळीवरून पुन्हा उसळला आणि त्याने हिरव्या निशाणात प्रवेश केला. निफ्टीनेही पुन्हा २२,७०० ची महत्त्वाची पातळी गाठली असून, या 'मिरॅकल रिकव्हरी'मुळे गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बाजारातील आजची 'रॉकेट' उसळी
दुपारी ३:१५ च्या सुमारास बाजाराची स्थिती खालीलप्रमाणे होती.
सेन्सेक्स : ३१४.५६ अंकांच्या (०.४३%) वाढीसह ७३,४४८.८८ वर व्यवहार करत होता. सकाळी हाच इंडेक्स ७१,५४५ पर्यंत खाली घसरला होता.
निफ्टी ५० : ८०.१५ अंकांच्या वाढीसह २२,७५९.५५ वर पोहोचला. सत्रादरम्यान निफ्टी २२,२०० च्याही खाली गेला होता.
बाजाराच्या या 'कमबॅक'ची ३ प्रमुख कारणे
१. खालच्या स्तरावर जोरदार खरेदी
सकाळी बाजार २ टक्क्यांहून अधिक पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी स्वस्त झालेल्या शेअर्समध्ये 'व्हॅल्यू बाइंग' सुरू केली.
आयटी क्षेत्राचा पुढाकार: निफ्टी आयटी इंडेक्समध्ये १.७६% ची मोठी वाढ झाली. यामध्ये कोफोर्ज (३%), एलटीआयमाईंडट्री (२%) आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स (२%) यांसारख्या शेअर्सनी तेजीचे नेतृत्व केले.
२. रुपयाची १२ वर्षांतील ऐतिहासिक झेप
भारतीय रुपयाने आज डॉलरच्या तुलनेत सुमारे २% ची मोठी उसळी घेतली आणि तो ९२.८७ च्या स्तरावर पोहोचला. सप्टेंबर २०१३ नंतरची ही रुपयाची सर्वात मोठी एका दिवसातील वाढ आहे.
आरबीआयची 'फिल्डिंग': रिझर्व्ह बँकेने सट्टेबाजी रोखण्यासाठी परदेशी डेरिव्हेटिव्ह्जवर कडक निर्बंध लादल्याने रुपयाला बळ मिळाले. जेव्हा शेजारील देशांची चलने कमकुवत होत होती, तेव्हा रुपयाने मात्र मजबूती दाखवून बाजाराला सावरले.
३. तांत्रिक कारणे
तांत्रिक विश्लेषकांच्या मते, जोपर्यंत निफ्टी २२,२२० च्या वर टिकून आहे, तोपर्यंत गुंतवणूकदार 'लॉन्ग पोझिशन' कायम ठेवू शकतात. आज निफ्टीने याच स्तरावरून शानदार रिव्हर्सल दाखवले आहे.
वाचा - ५ वर्षांत ४७००% परतावा! 'MIC इलेक्ट्रॉनिक्स'ला रेल्वेकडून मोठं कंत्राट; शेअरला अप्पर सर्किट
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
