Stock Market Today: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार विक्री झाल्यानंतर आज बाजारात किंचित सुधारणा दिसून येत आहे. सेन्सेक्स १२२ अंकांनी वधारून ७६,१४६ वर पोहोचला. निफ्टी २७ अंकांनी वधारून २३,१९२ वर पोहोचला. बँक निफ्टी १३९ अंकांनी वधारून ५०,९६६ वर तर, रुपया ८५.४७ च्या तुलनेत ८५.६८/ डॉलरवर उघडला. आजही निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी विक्री दिसून येत आहे. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर केवळ आयटी आणि रियल्टी इंडेक्स शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. उर्वरित मेटल, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून येतेय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री सर्व देशांवर शुल्काची घोषणा करू शकतात. या निर्णयामुळे अमेरिकेला शुल्कातून दिलासा देण्याचा प्रयत्न होणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संभाव्य घोषणेचा परिणाम जागतिक व्यापार व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाजारात अस्थिरता येऊ शकते. काल भारतीय बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) रोख बाजारात ५,९०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, जी २८ फेब्रुवारीनंतरची सर्वात मोठी विक्री आहे. मात्र, देशांतर्गत फंडांनी या घसरणीचा फायदा घेत ४,३०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करून बाजाराला काही प्रमाणात आधार दिला.
अमेरिकन बाजारात अस्थिरता
काल अमेरिकन बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. ४७० अंकांची सुधारणा होऊनही डाऊ जोन्स ११ अंकांनी घसरून बंद झाला. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर नॅसडॅकने १५० अंकांची तेजी नोंदवली, ज्यामुळे तो सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून सावरण्यास मदत झाली. गिफ्ट निफ्टीही २३,३०० अंकांच्या आसपास फ्लॅट दिसत आहे, तर डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी आणि निक्केई १०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
आरबीआयची कारवाई
रोकड टंचाईवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सातत्यानं कार्यरत आहे. या महिन्यात चार टप्प्यांत ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या (ओएमओ) माध्यमातून एकूण ८०,००० कोटी रुपयांची तरलता आणली जाणार आहे. २०,००० कोटी रुपयांची पहिली रोखे खरेदी आज होणार आहे, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रातील तरलता वाढेल आणि व्याजदरांवरही परिणाम होऊ शकतो.
भारताची संरक्षण निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचलीये. गेल्या आर्थिक वर्षात ती १२ टक्क्यांनी वाढून २३,६०० कोटी रुपयांवर पोहोचली होती. तर दुसरीकडे वाहन क्षेत्रातही सकारात्मक चिन्हं दिसू लागलीत. टाटा मोटर्स आणि ह्युंदाईनं मार्चमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त विक्री नोंदवली. विशेष म्हणजे टाटा मोटर्सच्या देशांतर्गत कार विक्रीत ३ टक्क्यांची वाढ झाली.