Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारातील गेल्या २ दिवसांच्या सलग घसरणीला अखेर ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून जागतिक राजकारणात सुरू असलेल्या अनिश्चिततेचे ढग अखेर विरले असून, त्याचे सकारात्मक पडसाद गुरुवारी शेअर बाजारात उमटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय नाटो देशांवरील आयात शुल्क वाढवण्याची धमकी मागे घेतल्याने आणि ग्रीनलँड वादावर चर्चेची तयारी दर्शवल्याने गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारातही सकाळीच 'बुल्स'चे वर्चस्व पाहायला मिळाले.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३१.३९ अंकांच्या जोरदार वाढीसह ८२,५४१.०२ वर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी १५७.२० अंकांच्या तेजीसह २५,३१४.७० च्या पातळीवर पोहोचला. महत्त्वाचे म्हणजे, निफ्टीने २५,३०० चा अत्यंत महत्त्वाचा अडथळा पार करून त्या स्तरावर आपली पकड मजबूत केली आहे.
जागतिक बाजारातून 'बूस्टर डोस'
अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर काल रात्री मोठी रॅली पाहायला मिळाली. एसअँडपी ५०० इंडेक्सने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी एका दिवसातील वाढ नोंदवली. ट्रम्प यांच्या मवाळ भूमिकेमुळे अमेरिका आणि युरोपमधील संभाव्य 'ट्रेड वॉर' टळल्याचे संकेत मिळत आहेत. या ग्लोबल रॅलीचा सकारात्मक परिणाम आशियाई बाजारांवरही झाला आणि भारतीय गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
सेक्टोरल अपडेट्स आणि चर्चेतील शेअर्स
आजच्या सत्रात विशेषतः बँकिंग, आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून आली. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, बायोकॉन आणि एचपीसीएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकारात्मक हालचाल होती. तर इंडिगो, सीईएससी आणि एटरनल या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी मोठी रस दाखवला. कंपन्यांचे आगामी तिमाही निकाल आणि कंपनी-विशिष्ट घडामोडींमुळे या शेअर्समध्ये अधिक चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
वाचा - मध्यमवर्गीयांचे 'घरकुला'चे स्वप्न होणार साकार? गृहकर्जात मोठा दिलासा मिळण्याचे संकेत
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
