Share Market Today : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आज, शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. या तीव्र विक्रीमुळे गुंतवणूकदारांना आज आणखी मोठा फटका बसला असून, २.०४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स ४६५.७५ अंकांनी कोसळून ८३,९३८.७१ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी १५५.७५ अंकांनी घसरून २५,७२२.१० च्या पातळीवर स्थिरावला.
बाजारात आज नफावसुलीचा मोठा दबाव दिसून आला. ब्रॉडर मार्केटमधील बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही ०.५० टक्क्यांपर्यंतची घसरण झाली.
मीडिया आणि मेटलमध्ये मोठी विक्री
आजच्या व्यवहारात जवळपास सर्वच प्रमुख सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव राहिला. यातही सर्वाधिक घसरण मीडिया इंडेक्स मध्ये पाहायला मिळाली. मीडिया इंडेक्स १.३% तुटून दिवसातील सर्वात कमजोर सेक्टर ठरला. तर मेटल इंडेक्स १% ने खाली आला. इतर क्षेत्रात एफएमसीजी, आयटी आणि फार्मा शेअर्समध्येही मोठी विक्री दिसून आली, ज्यामुळे बाजारात सर्वव्यापी विक्री झाल्याचे संकेत मिळाले.
बाजारातील कमजोर भावना असतानाही पीएसयू बँक शेअर्समध्ये मात्र आज मजबूत वाढ दिसली. पीएसयू बँक इंडेक्स सुमारे १.३% च्या वाढीसह दिवसाचा प्रमुख सेक्टरल गेनर ठरला.
गुंतवणूकदारांचे नुकसान वाढले
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल कालच्या ४७२.३६ लाख कोटी रुपयांवरून आज ४७०.३२ लाख कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ, आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.०४ लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे.
आजचे टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स
बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ५ शेअर्स आज वाढीसह बंद झाले.
- भारत इलेक्ट्रॉनिक्स : ३.९५%
- लार्सन अँड टुब्रो : १.०९%
- टीसीएस : ०.९४%
- आयटीसी : ०.६३%
- स्टेट बँक ऑफ इंडिया : ०.३१%
सर्वाधिक घसरलेले सेन्सेक्स स्टॉक्स
- इटरनल : -३.५२%
- एनटीपीसी : -२.३९%
- कोटक महिंद्रा बँक : -१.८८%
- आयसीआयसीआय बँक : -१.७५%
- बजाज फिनसर्व : -१.२५%
वाचा - धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
आज एकूण ४,३०९ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,३७० शेअर्स घसरणीसह, तर केवळ १,७८४ शेअर्स तेजीसह बंद झाले. जागतिक बाजारातून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळे पुढील आठवड्यातही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
