Stock Market News : अमेरिकेची रिझर्व्ह बँक फेडने नुकतेच व्याजदर कपातीची घोषणा केली. मात्र, या कपातीनंतर जगभरातील शेअर बाजारात भूकंप आले आहेत. याला भारतीय शेअर बाजारही अपवाद ठरला नाही. देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (१९ डिसेंबर) निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होत असून आज बाजारात प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. सकाळची सुरुवात पडझडीने झाली. तर सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, तर निफ्टीही सुमारे ३०० अंकांनी घसरला आणि २४,४०० च्या खाली आला. निफ्टी बँकही ८०० हून अधिक अंकांनी घसरली होता. मिडकॅप निर्देशांकात मोठी घसरण झाली असून तो १,००० हून अधिक अंकांनी घसरला.
यूएस फेडरल रिझर्व्हने काल रात्री (भारतीय वेळेनुसार) व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली. यासोबत वर्षात फक्त २ वेळाच व्याजदरात कपात करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी अशी कपात ४ वेळा करणार असल्याचे सांगितले होते. या बातमीमुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे ३.७ लाख कोटींचे नुकसान झाले.
फार्मा वगळता सर्व क्षेत्रांत मोठी घसरण
बातमीनुसार, आजच्या व्यवहारादरम्यान, फार्मा वगळता सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि बँक निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्यात सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण झाली एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह, तर डॉ रेड्डीज, सन फार्मा आणि सिप्ला यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.