Share Market News : गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड घसरणीनंतर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारानं आठवड्याची सुरुवात तेजीसह केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९८.५८ अंकांनी वधारून ७८,५४०.१७ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निर्देशांक निफ्टी ५० देखील १६५.९५ अंकांनी वधारून २३,७५३.४५ वर बंद झाला. आज निफ्टीत जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि ट्रेंटचे शेअर्स सर्वाधिक वधारले. हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
या क्षेत्रात चढ-उतार
क्षेत्रनिहाय सांगायचं झालं बँकिंग, एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस, एनर्जी, रियल्टी निर्देशांक ०.५ ते १ टक्क्यांनी वधारले, तर मीडिया निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी घसरला. याआधी शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या पाच सत्रात ५ टक्क्यांनी घसरला होता. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४४१ लाख कोटी रुपयांवरून ४४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, एकाच सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
जगभरातील शेअर बाजारात संमिश्र कल
सोमवारी जगभरातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. अमेरिकेच्या शेअर बाजारातही तेजी दिसून आली. तरीही बेंचमार्क एस अँड पी ५०० या आठवड्यात २% घसरला आणि जर्मनीचा डीएएक्स ०.३% घसरून १९,८३.४२ वर आला. पॅरिसमधील सीएसी ४० हा ०.३ टक्क्यांनी घसरून ७,२५१.०५ वर, तर ब्रिटनचा एफटीएसई ०.२ टक्क्यांनी घसरून ८,०६८.१७ वर आला. एस अँड पी ५०० फ्युचर्स ०.२% वधारले, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ०.१% वधारले. आशियाई बाजारात टोकियोचा निक्केई २२५ निर्देशांक १.२ टक्क्यांनी वधारून ३९,१६१.३४ वर पोहोचला.