Stock Market Holidays: नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं (NSE) २०२६ वर्षासाठी शेअर बाजाराच्या अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, पुढील वर्षी भारतीय शेअर बाजार एकूण १५ दिवस बंद राहील. या सुट्ट्या राष्ट्रीय उत्सव तसेच देशभरात साजऱ्या होणाऱ्या प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक सणांमुळे असतील. बाजाराची ही सुट्टीची यादी गुंतवणूकदार, ट्रेडर्स आणि ब्रोकिंग फर्म्ससाठी महत्त्वाची मानली जाते, जेणेकरून ते आपली ट्रेडिंग आणि गुंतवणुकीची रणनीती आधीच तयार करू शकतील.
प्रमुख सणांदरम्यान राहणार बाजार बंद
एनएसईनं जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, २०२६ मध्ये प्रजासत्ताक दिन, होळी, गुड फ्रायडे, ईद, दिवाळी आणि ख्रिसमस यांसारख्या मोठ्या प्रसंगी शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत. विशेष म्हणजे, या १५ सुट्ट्यांपैकी ५ सुट्ट्या शुक्रवारी येत आहेत. याचा अर्थ, अनेक प्रसंगी गुंतवणूकदारांना लाँग वीकेंडचा फायदा मिळू शकतो आणि बाजारातील व्यवहार दीर्घकाळ थांबतील.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
१ फेब्रुवारी, रविवार बाजार खुला राहणार?
पुढील वर्षी बजेटच्या दिवशी शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग सेशन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अशी प्रथा आहे की, जर बजेट शनिवार किंवा रविवारी असेल, तरीही शेअर बाजार विशेष सत्रासाठी उघडला जातो, जेणेकरून गुंतवणूकदार आणि इन्स्टिट्युशनल प्लेअर्स अर्थसंकल्पातील घोषणांवर त्वरित प्रतिक्रिया देऊ शकतील. याच प्रथेनुसार १ फेब्रुवारी २०२६ रोजीही बाजार सुरू राहण्याची पूर्ण शक्यता आहे.
१५ सुट्ट्या कोणत्या?
- २६ जानेवारी २०२६ (सोमवार) - प्रजासत्ताक दिन
- ३ मार्च २०२६ (मंगळवार) - होळी
- २६ मार्च २०२६ (गुरुवार) - श्रीराम नवमी
- ३१ मार्च २०२६ (मंगळवार) - श्री महावीर जयंती
- ३ एप्रिल २०२६ (शुक्रवार) - गुड फ्रायडे
- १४ एप्रिल २०२६ (मंगळवार) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- १ मे २०२६ (शुक्रवार) – महाराष्ट्र दिन
- २८ मे २०२६ (गुरुवार) – बकरी ईद
- २६ जून २०२६ (शुक्रवार) – मोहरम
- १४ सप्टेंबर २०२६ (सोमवार) – गणेश चतुर्थी
- २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) – महात्मा गांधी जयंती
- २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार) – दसरा
- १० नोव्हेंबर २०२६ (मंगळवार) – दिवाळी – बलिप्रतिपदा
- २४ नोव्हेंबर २०२६ (मंगळवार) – श्री गुरु नानक देव यांचे प्रकाश गुरु पर्व
- २५ डिसेंबर २०२६ (शुक्रवार) – ख्रिसमस
