Mahashivratri Share Market Holiday: शेअर बाजाराचं कामकाज सोमवार ते शुक्रवार सुरू असतं. परंतु बँक हॉलिडेच्या निमित्तानं सुट्टी आल्यास शेअर बाजाराचंही कामकाज बंद राहतं. उद्या शिवरात्रीच्या मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. उद्या एनएसई आणि बीएसईमध्ये ट्रेडिंग होणार नाही. महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रुवारी २०२५ बुधवारी बंद राहणार आहे. या दिवशी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी व्यवहार होणार नाहीत.
कोणत्या दिवशी राहणार बाजार बंद?
महाशिवरात्रीनंतर १४ मार्च रोजी होळीच्या निमित्तानं आणि ३१ मार्चला ईद-उल-फित्रनिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. एप्रिल महिन्यातही मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असतील. या महिन्यात १० तारखेला महावीर जयंती, १४ तारखेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि १८ तारखेला गुड फ्रायडे आहे. या तीन दिवसांत शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. त्यानंतर मे महिन्यात १ तारखेला महाराष्ट्र दिन असून त्या दिवशीही बाजारात कामकाज राहणार नाही.
ऑगस्टमध्ये १५ तारखेला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव होणार असून २७ तारखेला गणेश चतुर्थीचा उत्साह बाजारात रंगणार आहे. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसरा, २१-२२ ऑक्टोबरला दिवाळी, ५ नोव्हेंबरला प्रकाश गुरुपर्व आणि २५ डिसेंबरला ख्रिसमस आहे. शेअर बाजारात या दिवसात व्यवहार होणार नाहीत.
भारतीय शेअर बाजार सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी उघडतो आणि दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी बंद होतो. प्री-ओपन सेशन सकाळी ९ वाजता सुरू होतं आणि बाजार ९.१५ वाजता उघडतं. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी शेअर बाजार बंद होतो. बहुतांश बाजारपेठांमध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व्यापार होत नाही.
लक्ष्मीपूजनाला विशेष ट्रे़डिंग
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीच्या (लक्ष्मीपूजन) काळात बाजारात नियमित काम होणार नाही, पण विशेष "मुहूर्त ट्रेडिंग" सत्र नक्कीच होणार आहे. वर्षातून एकच दिवस असा असतो जेव्हा सुट्टीच्या दिवशी बाजार चालतो. पण यादरम्यान काम १ तास चालतं. या अधिवेशनाची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एक्स्चेंजच्या अधिकृत घोषणांच्या आधारे या तारखा बदलू शकतात.