Stock market holidays : या वर्षीचा शेवटचा महिना आजपासून सुरू झाला आहे. डिसेंबर महिना अनेक आर्थिक कामाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. या महिन्यात आरबीआयची पतधोरण बैठक होणार आहे. तुमच्या व्याजदराचा हप्ता कमी होणार की वाढणार? हे स्पष्ट होईल. दरम्यान, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला या महिन्यात फार कमी दिवस बाजारात व्यवहार करता येणार आहेत. कारण, या नवीन महिन्यात साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त, असाही एक दिवस आहे जेव्हा शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
शेअर बाजारात सुट्टी कधी असणार?
जर आपण शेअर बाजारातील सुट्ट्यांच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्या दिवशीला बुधवार आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात शनिवार आणि रविवारी भारतीय शेअर बाजार बंद राहतील. डिसेंबर महिन्यात ७, १४, २१ आणि २८ तारखेला चार शनिवार आणि महिन्याच्या १, ८, १५, २२ आणि २९ तारखेला ५ रविवार येत आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये येणाऱ्या शेअर बाजारातील सर्व सुट्टींचा समावेश केल्यास, BSE आणि NSE वरील ट्रेडिंग सत्रात ३१ पैकी १० दिवस व्यवहार होणार नाहीत. याचा अर्थ २०२४ मध्ये फक्त २१ व्यवहार होणार आहेत.
२०२४ मध्ये किती सुट्ट्या होत्या?
२०२४ च्या कॅलेंडरनुसार बीएसई आणि एनएसईने एकूण १४ शेअर बाजार सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. मात्र, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. याशिवाय, २० मे २०२४ रोजी मुंबईत लोकसभा आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी बीएसई आणि एनएसईने संबंधित दिवशी शेअर बाजाराला सुटी जाहीर केली होती. अशा परिस्थितीत, यावर्षी शेअर बाजारात एकूण १७ सुट्ट्या आहेत.
गेल्या आठवड्यातील बाजाराची स्थिती
या संपूर्ण आठवड्यात शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहयला मिळाली. कधी बाजाराने १ हजार अंकाची उसळी घेतलेली पाहायला मिळाली. तर कधी हजार अंकांनी सेन्सेक्स आपटलेलाही पाहायला मिळाला. गेल्या शुक्रवारी बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ७५९.०५ अंकांनी वाढून ७९,८०२.७९ वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी देखील २१६.९५ अंकांनी वाढून २४,१३१.१० वर बंद झाला.