Stock Market Crash : गेल्या ४ महिन्यांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. आता तर रोज उठून कितीने कोसळलं? अशी विचारण्याची वेळ आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. सकाळच्या व्यवहारातच निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. निफ्टी ५० ने २२,४३३ च्या नीचांकी पातळीवर सुरुवात केली आणि नंतर २२,१२० च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर जाऊन ४०० हून अधिक अंकांची घसरण दाखवली. त्याच वेळी, सेन्सेक्सने ७४,२०१ च्या पातळीवर सुरुवात करुन १,४०० हून अधिक अंकांची घसरण नोंदवली. या घसरणीमागील ३ मोठी कारणे समोर आली आहेत.
मार्केटमध्ये विक्रीचा दबाव
आजची विक्री केवळ फ्रंटलाइन इंडेक्सपुरती मर्यादित नव्हती. बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांकात ३.४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर बीएसई मिड-कॅप निर्देशांकात जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली. पतंजली फूड्स, ग्रॅन्युल्स इंडिया, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, दीपक फर्टिलायझर्स आणि रेडिंग्टन यांसारख्या शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले. तर केईआय इंडस्ट्रीज, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, पॉलीकॅब इंडिया, आयईएक्स, आरआर केबल आणि कोल इंडिया या समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.
दुपारी १ वाजेपर्यंत, ८१ बीएसई-सूचीबद्ध शेअर्स अपर सर्किटमध्ये पोहोचले, तर ४६० शेअर्स लोअर सर्किटमध्ये लॉक राहिले. या कालावधीत, ४६ शेअर्सनी त्यांच्या ५२-आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला, तर ८१७ शेअर्सनी त्यांची ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.
जीडीपी डेटा
वास्तविक, डिसेंबर तिमाहीचे जीडीपीचे आकडे आज संध्याकाळी जाहीर होणार आहेत. या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल, अशी आशा गुंतवणूकदारांना वाटते. पण आर्थिक वाढीचा वेग, कमाईचा वेग आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री याचा बाजारावर परिणाम झाला आहे. सप्टेंबरअखेर बाजार विक्रमी उच्चांकावरून १४ टक्क्यांनी घसरला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
NSDL डेटानुसार विदेशी गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये आतापर्यंत १,१३,७२१ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले आहेत. फेब्रुवारीमध्ये, FII ने भारतीय समभागांमध्ये ४७,३४९ कोटी रुपयांची विक्री केली, तर DII ने ५२,५४४ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली.
आयटी शेअर्सवर मोठा दबाव
एमएससीआय एशिया एक्स-जपान निर्देशांक १.२१ टक्क्यांनी घसरल्याने आशियाई बाजारातही घसरण झाली. वॉल स्ट्रीटवर एनव्हिडीयाच्या कमकुवत निकालानंतर ही घसरण झाली आहे. एनव्हिडीयाच्या कमाईच्या अहवालानंतर AI स्टॉकची देखील विक्री झाली, ज्यात "मॅग्निफिसेंट सेव्हन" मेगा-कॅप कंपन्यांचा समावेश आहे. बातमी लिहेपर्यंत, निफ्टी आयटी निर्देशांक ३.२ टक्क्यांनी घसरला, ज्यामध्ये पर्सिस्टंट सिस्टम्स, टेक महिंद्रा आणि एमफेसिस सारख्या कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले.