Stock Market News : अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ११५३ अंकांच्या घसरणीसह उघडला. देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (१९ डिसेंबर) निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होत असून आज बाजारात प्रचंड दबाव पाहायला मिळत आहे. सकाळची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, तर निफ्टीही सुमारे ३०० अंकांनी घसरला आणि २४,४०० च्या खाली आला. निफ्टी बँकही ८०० हून अधिक अंकांनी घसरला होता. मिडकॅप निर्देशांकात मोठी घसरण झाली असून तो १,००० हून अधिक अंकांनी घसरला.
शेअर बाजार का पडला?
फेडरल रिझर्व्हने बुधवारी रात्री प्रमुख व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली. बाजाराला याची आधीच अपेक्षा होती. नवीन वर्षात फेडकडून दरकपातीबाबत गुंतवणूकदारांना भरपूर आशा होत्या. मात्र, फेडच्या निर्णयानंतर ते निराश झाले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये दोनदा ०.२५ टक्के कपात केली जाऊ शकते. तर यापूर्वी हा अंदाज ४ वेळा ०.२५ टक्के कपातीचा होता.
जागतिक बाजारातही घसरण
२०२५ मध्ये यूएस फेडच्या दर कपातीच्या अंदाजांचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम झाला आहे. बहुतांश आशियाई बाजार आज घसरले आहेत. एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅकमध्ये सुमारे ३ टक्के घसरण झाली. डाऊ जॉन्स २.५८ टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचवेळी, अमेरिकन डॉलरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यूएस फेडच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरने जवळपास २ वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे.
या शेअर्समध्ये घसरण
निफ्टी पॅक समभागांमध्ये आज सर्वात मोठी घसरण एशियन पेंटमध्ये २.२० टक्के, हिंदाल्को २.१४ टक्के, टाटा स्टील १.९७ टक्के, बीईएल १.९४ टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रा १.९० टक्क्यांनी झाली. त्याचवेळी, डॉ. रेड्डी आणि टाटा कंझ्युमरच्या समभागांनी सर्वाधिक वाढ दर्शविली.
सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण
गुरुवारी सकाळी सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना दिसले. सर्वात मोठी घसरण निफ्टी मेटलमध्ये १.५७ टक्के झाली. याशिवाय निफ्टी आयटी १.१६ टक्के, निफ्टी बँक १.१९ टक्के, निफ्टी ऑटो १.२१ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस १.२७ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.३३ टक्के, निफ्टी मीडियामध्ये ०.७५ टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.०३ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत १.१२ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत १.११ टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये ०.७४ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये ०.१० टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये ०.७७ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.९२ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये ०.३२ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ०.९४ टक्के आणि निफ्टीकॉम आणि एमआयआयटीमध्ये ०.७९ टक्के घसरण दिसून आली.