share market Crashed : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिवसा तारे दिसले. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी १% पेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. बाजारातील या सततच्या घसरणीची अनेक मोठी कारणे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्युत्तर शुल्काची धमकी आणि भारत सर्वाधिक शुल्क आकारतो याचा पुनरुच्चार. याशिवाय विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्रीही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.
सोमवारी एका वेळी सेन्सेक्स १% पेक्षा जास्त घसरणीसह ७४,५०३ च्या पातळीवर कार्यरत होता. याशिवाय, निफ्टीमध्ये सुमारे २५० अंकांची कमजोरी दिसून आली. तो २२,५४८ च्या पातळीवर कार्यरत होता. जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर आज १३ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कमजोरी दिसून येत आहे. आयटी आणि वित्तीय क्षेत्रावर सर्वाधिक दबाव दिसून येत आहे.
आयटी सेक्टरमध्ये सर्वाधिक कोसळणारे शेअर्स
आयटी क्षेत्र २% पेक्षा जास्त आणि वित्तीय क्षेत्र १.५% ने घसरले आहे. त्याचवेळी निफ्टी फार्मा क्षेत्रात अर्धा टक्का वाढ दिसून आली आहे. सर्वाधिक घसरलेल्या समभागांच्या यादीत HCL टेक, इंडसइंड बँक, झोमॅटो, टेक महिंद्रा, TCS, ICICI बँक, HDFC बँक आणि पॉवर ग्रिड यांचा समावेश आहे.
शेअर बाजार घसरण्याचं मोठं कारण काय?
ट्रम्प टॅरिफची दहशत : डोनाल्ड ट्रम्प सातत्याने प्रत्युत्तर आयात शुल्काची धमकी देत आहे. ट्रम्प यांनी भारत आणि चीनसारख्या देशांवर प्रत्युत्तर शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे बाजारात भितीचे वातावरण आहे. शुक्रवारी त्यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्या शपथविधी समारंभात ट्रम्प म्हणाले की त्यांचे प्रशासन लवकरच भारत आणि चीनसारख्या देशांवर जशास तसे शुल्क लादणार आहे.
परकीय गुंतवणूकदारांची पाठ : विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी ३,४४९.१५ कोटी रुपयांचे समभाग विकले, ज्यामुळे या महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून २३,७१० कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत. जागतिक व्यापाराच्या चिंतेत २०२५ मध्ये आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढून घेतले आहेत.
यूएस वाढीवर संकट : यूएस बाजार शुक्रवारी तोट्यासह बंद झाला. कारण आर्थिक डेटा मंद व्यावसायिक घडामोडी आणि कमकुवत ग्राहक भावना दाखवत आहे. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील व्यावसायिक घडामोडी १७ महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्यामुळे आर्थिक अनिश्चिततेबाबत चिंता वाढली आहे. अमेरिकेत ५ वर्षात सरासरी महागाई ३.५% असण्याचा अंदाज आहे.
मंदीची चिंता : मंद वाढ आणि वाढत्या चलनवाढीमुळे अमेरिकेतील निर्यात संबंधित स्टॉक्सवर दबाव आहे. यामुळेच आज आयटी शेअर्समध्ये घसरण होत आहे. इतर उदयोन्मुख बाजारपेठा आता परदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक दिसत आहेत.