Share Market : मंगळवारी भारतीय शेअर बाजार दिवसभर घसरणीत राहून अखेरीस लाल निशाणीत बंद झाला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सलग चौथ्या दिवशी झालेली जोरदार विक्री, जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि सेक्टर-वाईज नफावसुली यामुळे भारतीय निर्देशांकांवर मोठा दबाव आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१९ अंकांनी कोसळून ८३,४५९ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० १६६ अंकांनी घसरून २५,५९७ च्या स्तरावर आला.
आज बाजाराची स्थिती अत्यंत कमकुवत राहिली. ॲडव्हान्स-डिक्लाईन रेशो १:२ असा होता, म्हणजेच वाढलेल्या शेअर्सच्या तुलनेत घसरलेल्या शेअर्सची संख्या दुप्पट होती. निफ्टी ५० मधील ५० पैकी ४० शेअर्स लाल निशाणीत बंद झाले.
आज बाजार का कोसळला?
१. FII ची सलग चौथ्या दिवशी विक्रमी विक्री
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी १,८८३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. २९ ऑक्टोबरपासून FIIs ने सलग चौथ्या दिवशी भारतीय इक्विटीमध्ये विक्रीचा सपाटा लावला आहे. या चार सत्रांत FIIs ने एकूण १४,२६९ कोटी रुपयांची विक्री केली आहे.
२. जागतिक बाजारातून कमकुवत संकेत
आज आशियाई बाजारांमध्येही नफावसुली दिसून आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५ आणि चीनचा शांघाय कंपोसाइट हे सर्व लाल निशाणीत बंद झाले. त्याचबरोबर अमेरिकन फ्युचर्स देखील १% पर्यंत तुटले, ज्यामुळे वॉल स्ट्रीटमध्ये कमकुवत सुरुवातीची शक्यता आहे. या दुहेरी दबावामुळे भारतीय बाजार खाली खेचला गेला.
३. सेक्टर-वाईज नफावसुली
बँकिंग, आयटी, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांतील तेजीनंतर नफावसूल करणे पसंत केले. 
४. कमकुवत तिमाही निकाल आणि आयटी क्षेत्रावरील दबाव
काही बँकिंग कंपन्यांचे तिमाही निकाल स्थिर असले तरी आयटी क्षेत्राचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले. अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये दर कपातीची शक्यता कमी झाली, ज्यामुळे टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या हेवीवेट स्टॉक्समध्ये १% पर्यंत घसरण झाली आणि संपूर्ण आयटी इंडेक्सवर दबाव आला.
वाचा - 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
५. डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीचा परिणाम
निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरीपूर्वी ट्रेडर्स आपले पोझिशन रोलओव्हर करत आहेत, ज्यामुळे बाजारात चढ-उतार वाढला आहे.
