ITI Share Price : शेअर बाजारातील उलथापालथीदरम्यान टेलिकॉम कंपनी आयटीआयच्या शेअरनं (ITI Share Price) ५४४.७० रुपयांचा उच्चांक गाठला. आज सकाळी कंपनीचा शेअर ४७३.४० रुपयांवर उघडला आणि लवकरच ५४४.७० रुपयांवर पोहोचला. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा शेअर १४.६० टक्क्यांनी वधारून ५२३.८५ रुपयांवर व्यवहार करत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
गेल्या वर्षभरात आयटीआय लिमिटेडच्या शेअरची किंमत ५२ आठवड्यांच्या नीचांकी २१० रुपयांवरून आजच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
का होतेय वाढ?
आयटीआयच्या या शेअरमधील तेजीच्या मागे त्यांना मिळालेली अनेक कंत्राटं आहेत. यात भारतनेटशी संबंधित मोठे प्रकल्प आणि भारतभर दूरसंचार पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या उद्देशानं इतर सरकारी उपक्रमांचा समावेश आहे. या करारांमुळे आयटीआयच्या महसुलात वाढ होईल आणि येत्या तिमाहीत नफ्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
याशिवाय आयटीआय लिमिटेडच्या आर्थिक कामगिरीतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री मागील कालावधीच्या तुलनेत ३१२ टक्क्यांनी वाढून १,०१६.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, मागील कालावधीच्या तुलनेत त्याचा निव्वळ तोटा लक्षणीय रित्या कमी झाला आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
आयटीआय लिमिटेडच्या शेअरवर मार्केट एक्सपर्ट बुलिश आहेत, अनेकांनी त्याच्या मजबूत मूलभूत गोष्टी आणि वाढीच्या संभाव्यतेच्या आधारे बाय रेटिंगदिलं आहे. आयटीआयची मजबूत ऑर्डर बुक आणि चालू असलेले सरकारी प्रकल्प दूरसंचार क्षेत्रातील निरंतर वाढीसाठी चांगलं स्थान देत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)