Stock Market Today : टॅरिफच्या तणावामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी, सोमवारी ब्रेक लागला. देशाच्या जीडीपीच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास परतला. आयटी व ऑटो शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली.
सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ५५४ अंकांनी वाढून ८०,३६४.४९ या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० देखील १९८.२० अंकांनी वर चढून २४,६०० च्या पुढे गेला.
या शेअर्सनी घेतली भरारी
आज ज्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली, त्यात महिंद्रा अँड महिंद्रा ३.६५% च्या वाढीसह टॉपवर राहिले. त्यानंतर टाटा मोटर्स ३.१७%, ट्रेंट २.७१, एटरनल २.२३% आणि एशियन पेंट्सचे स्टॉक्स २.१३% वर चढले.
आजचे टॉप लूजर
आजच्या टॉप लूजरमध्ये सन फार्मा १.८७% ने घसरून सर्वात खाली राहिले. त्यासोबतच आयटीसी ०.९९%, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.४४%, टायटन ०.२८% आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ०.२४% ची घट नोंदवली गेली.
जीडीपी आणि जीएसटी सुधारणांचा फायदा
जिओजित इन्वेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “भारताच्या जीडीपी वाढीचा पहिल्या तिमाहीचा आकडा ७.८% राहिला, जो अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे.” ते पुढे म्हणाले की, आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीतील जीएसटी सुधारणांनीही देशांतर्गत बाजाराला सावरण्यास मदत केली. याचा थेट फायदा ऑटो आणि उपभोग्य वस्तूंच्या शेअर्सना झाला आहे.