Shyam Dhani Industries IPO Listing: श्याम धनी इंडस्ट्रीज या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ७० रुपयांच्या मूळ किमतीच्या तुलनेत ९० टक्के नफ्यासह १३३ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर लगेचच शेअरमध्ये आणखी ५ टक्क्यांची वाढ होऊन तो १३९.६५ रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की, श्याम धनी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी १०० टक्क्यांची उसळी घेत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
आयपीओला मिळाला ९८८ पट प्रतिसाद
श्याम धनी इंडस्ट्रीजच्या आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओवर एकूण ९८८.२९ पट बोली लागली होती. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ११३७.९२ पट, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १६१२.६५ पट सबस्क्रिप्शन मिळालं. तसंच पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIB) श्रेणीत २५६.२४ पट बोली लागली. या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना किमान २ लॉटसाठी बोली लावणं आवश्यक होतं, ज्यामध्ये ४००० शेअर्स होते. यासाठी गुंतवणूकदारांना २,८०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती.
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
काय आहे कंपनीचा व्यवसाय?
१९९५ मध्ये सुरू झालेली श्याम धनी इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक ISO प्रमाणित कंपनी आहे. ही कंपनी प्रीमियम मसाले, अख्खे मसाले आणि दळलेल्या मसाल्यांचं उत्पादन, निर्यात आणि घाऊक विक्री करते. याव्यतिरिक्त कंपनी काळं मीठ, सैंधव मीठ, तांदूळ, पोहे, कसुरी मेथी, ऑरेगॅनो, पेरी पेरी, चिली फ्लेक्स, मिश्र औषधी वनस्पती, ओनिअन फ्लेक्स आणि टोमॅटो पावडर यांसारख्या उत्पादनांचे ट्रेडिंग आणि वितरणही करते. कंपनी आपली उत्पादनं 'श्याम' या ब्रँड नावानं विकते. कंपनीचा उत्पादन प्रकल्प राजस्थानमधील जयपूर येथे आहे. कंपनी होलसेलर्स, सुपरमार्केट, रिटेल चेन आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपला व्यवसाय चालवते.
आयपीओचा तपशील आणि प्रमोटर्स
श्याम धनी इंडस्ट्रीजचा आयपीओ २२ डिसेंबर २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि २४ डिसेंबरपर्यंत सुरू होता. या आयपीओची एकूण साईज ३८ कोटी रुपयांचा होता. राम अवतार अग्रवाल, ममता देवी अग्रवाल आणि विठ्ठल अग्रवाल हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. आयपीओपूर्वी प्रमोटर्सचा कंपनीतील हिस्सा ९८.११ टक्के होता, जो आता ७२ टक्क्यांवर आला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
