Easy Trip Planners : इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. निशांत पिट्टी यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. दरम्यान, इझी ट्रिप प्लॅनर्सचे सीएफओ आणि निशांत यांचे बंधू रिकांत पिट्टी यांची तात्काळ कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड ही ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर ईज माय ट्रिपची मूळ कंपनी आहे. बुधवारी बीएसईवर इझी ट्रिप प्लॅनर्सचा शेअर १५.७२ रुपयांवर बंद झाला.
निशांत पिट्टींनी विकले शेअर्स
या आठवड्याच्या सुरुवातीला निशांत पिट्टी कंपनीतील आपला हिस्सा विकू शकतात, अशी बातमी आली होती. ३१ डिसेंबर २०२४ रोजी इझी ट्रिप प्लॅनर्सचे ७८.३२ कोटी रुपयांचे शेअर्स ब्लॉक डीलमध्ये विकण्यात आले. कंपनीचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी हे शेअर्स विकले. निशांत पिट्टी यांनी कंपनीतील ४.९९ कोटी शेअर्स म्हणजेच १.४१ टक्के हिस्सा विकला आहे. ३१ डिसेंबरच्या व्यवहारानंतर इझी ट्रिप प्लॅनर्समधील निशांत पिट्टींचा हिस्सा १२.८ टक्क्यांवर आलाय. त्याचबरोबर कंपनीतील प्रवर्तकांची एकत्रित होल्डिंगही ५०.३८ टक्क्यांवरून ४८.९७ टक्क्यांवर आली.
सप्टेंबरमध्ये ९२० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकले
२५ सप्टेंबर २०२४ रोजी पिट्टींनी इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडच्या एकूण भागभांडवलाच्या १४% म्हणजेच २४.६५ कोटी शेअर्सची विक्री केली. या व्यवहाराचं एकूण मूल्य ९२० कोटी रुपयांपर्यंत होतं. गेल्या वर्षभरात इझी ट्रिप प्लॅनर्सचे शेअर्स २२ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर २०.३५ रुपयांवर होता. इझी ट्रिप प्लॅनर्सचे शेअर्स १ जानेवारी २०२५ रोजी १५.८० रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. पिट्टी हे २००८ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर होते आणि गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांची पुन्हा पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)