Stock Market Today: आज, आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात, बाजाराची सुरुवात घसरणीनं झाली. सुरुवातीनंतर, सेन्सेक्स ७० अंकांनी खाली तर निफ्टी ५० अंकांनी खाली व्यवहार करताना दिसला. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. फक्त मीडिया आणि ऑईल अँड गॅस क्षेत्र ग्रीन झोनमध्ये होतं. इंडिया VIX ३% वर होता. इंडिगोच्या शेअरची किंमत सुरुवातीच्या काळातच ५% पेक्षा जास्त घसरली.
निफ्टी ५० वर इंडिगो, इटर्नल, बीईएल, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, सन फार्मा हे सर्वाधिक घसरणीचे शेअर होते. तर, अॅक्सिस बँक, टीएमपीव्ही, टाटा कंझ्युमर, रिलायन्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एचयूएल, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निर्देशांकातील ५० समभागांपैकी फक्त १३ शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.
शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये रेंज-बाउंड ट्रेडमध्ये वाढ झाली, तर देशांतर्गत गुंतवणूकदार प्री-ओपनिंग सेशनमधील मोठ्या बदलांवर आणि अनेक प्रमुख कॉर्पोरेट बातम्यांवर लक्ष ठेवतील.
आजपासून फ्युचर्समध्ये प्री-ओपन सत्र
आजपासून, दोन्ही एक्सचेंजेसवर फ्युचर्स सेगमेंटमध्ये प्री-ओपन सेशन देखील लागू केलं जाईल. यामध्ये चालू महिन्यासाठी सर्व स्टॉक आणि इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जचा समावेश असेल. एक्सचेंजेसना आशा आहे की यामुळे अस्थिरता कमी होईल आणि ओपनिंग प्राईज डिस्कव्हरी अधिक पारदर्शक होईल.
भारत-अमेरिका व्यापार करारावरील महत्त्वाची बैठक
व्यापार करारावरील वाटाघाटींना गती देण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ या आठवड्यात भारताला भेट देणार आहे. १० ते १२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीत कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. बाजारासाठी हा एक महत्त्वाचा मॅक्रो ट्रिगर आहे.
