share market : मोदी सरकारने शनिवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. एकीकडे अर्थसंकल्पाने निराशा केली तर दुसरीकडे खराब जागतिक संकेत याचा दुहेरी परिणाम आज बाजारात पाहायला मिळाला. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. सत्राच्या अखेरीस दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी खालच्या पातळीवरून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला. आज कोणत्या क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. कोणी सावरलं? चला जाणून घेऊ.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाली. जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर, पीएसई, ऊर्जा, तेल आणि वायू इंडेक्स सर्वाधिक घसरले, धातू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये दबाव दिसून आला. त्याच वेळी, आयटी, फार्मा आणि ऑटो निर्देशांक वाढीने बंद झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.
या शेअर्समध्ये तीव्र चढउतार
व्यवहाराच्या शेवटी, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी इंडिया, भारती एअरटेल, झोमॅटो हे सेन्सेक्सवरील टॉप गेनर ठरले. तर, सर्वाधिक नुकसान झालेल्या स्टॉकमध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयटीसी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो यांचा समावेश होता. निफ्टी ५० मधील टॉप ५ लाभधारक समभागांमध्ये बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश होता, तर लार्सन अँड टुब्रो, टाटा कंझ्युमर, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया आणि बीईएल यांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती?
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मॅक्सिको या देशांवर आयात शुल्क लादल्यानंतर सोमवारच्या व्यवहारात जागतिक शेअर बाजार घसरले. फ्रान्सचा CAC ४० सुरुवातीच्या व्यापारात १.६% घसरून ७,८२६.१४ वर आला, तर जर्मनीचा DAX १.५% घसरून २१,३९५.३१ वर आला. तर ब्रिटनचा FTSE १०० १.३% घसरून ८,५६५.०० वर आला. ट्रम्प यांच्या निर्णयाचा यूएस स्टॉकवरही परिणाम होण्याची शक्यता होती.
जपानचा बेंचमार्क निक्केई २२५ २.७% घसरून ३८,५२०.०९ वर आला. ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX २०० १.८% घसरून ८,३७९.४० वर आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी २.५% घसरून २,४५३.९५ वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग ०.१% पेक्षा कमी घसरून २०,२१७.२६ वर आला, तर शांघायमधील व्यापार सुट्टीसाठी बंद होता. विश्लेषकांनी सांगितले की आशियाई बाजार संभाव्य व्यापार युद्धाच्या वाढीमुळे अस्थिर होऊ शकतो.