Upcoming IPO : नवीन वर्षात तुम्ही अजूनही गुंतवणुकीचा श्रीगणेशा केला नसेल तर दोन दिवस थांबा. कारण, पुढील आठवड्यात पैसे कमावण्याची संधी आली आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, आयपीओ मार्केटमध्ये बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मार्फत, २०२४ मध्ये २६८ कंपन्यांनी आयपीओद्वारे १.६७ लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारले. गेल्या वर्षी आयपीओ बाजारात आलेली ही तेजी नव्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल आयपीओतून खरच फायदा होतो का? तर गेल्या वर्षी १० पैकी ७ आयपीओंनी गुंतवणूकदारांना एकाच दिवसात १२५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
यावर्षी सुमारे १०० कंपन्यांनी सेबीकडे त्यांच्या ड्राफ्ट ऑफर दाखल केल्या आहेत. यंदा प्राइमरी मार्केटमध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीचा आयपीओ येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ७ नवीन IPO बाजारात येतील. ६ कंपन्या शेअर बाजारात लिस्टही होणार आहेत.
स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजीचा IPO नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी उघडेल. या IPO च्या शेअर्ससाठी गुंतवणूकदार ८ जानेवारीपर्यंत बोली लावू शकतील. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग IPO चा प्राइस बँड १३३ ते १४० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदार किमान १०७ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या IPO मधून जमा होणारी रक्कम मशिनरी खरेदी, कर्जाची परतफेड आणि इतर गरजांसाठी वापरली जाईल.
क्वाड्रंट फ्युचर टेक IPO
क्वाड्रंट फ्युचर टेकचा IPO ७ जानेवारीला उघडेल. १ कोटी शेअर्सच्या ताज्या इश्यूमधून ₹२९० कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हा IPO १४ जानेवारी रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध होईल. त्याची किंमत २७५ ते २९० रुपये पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार किमान ५० शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात.
कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट इन्व्हीट IPO
Capital Infra Trust InvIT चा IPO ७ जानेवारीला उघडेल. या IPO ची किंमत बँड ९९ ते १०० रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने १,५७८ कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूसाठी अर्ज केला आहे. इन्व्हीट प्रामुख्याने ९ महसूल निर्माण करणाऱ्या रस्ते प्रकल्पांचे संपादन आणि व्यवस्थापन यावर काम करते.
एसएमई आईपीओ
एसएमई विभागातील ४ IPO पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी उघडतील. इंडोबेल इन्सुलेशनचा IPO ६ जानेवारीपासून सुरू होईल, तर डेल्टा ऑटोकॉर्प, बीआर गोयल इन्फ्रास्ट्रक्चर आणि अवाक्स अपॅरल्स ७ जानेवारीपासून सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असतील.
डिस्क्लेमर : यात फक्त आयपीओची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.