Share Market IPO : गेल्या वर्षभरापासून भारतीय शेअर बाजारात विशेष हालचाल पाहायला मिळाली नाही. मात्र, नवरात्रीनंतर देशात फेस्टिव्ह सीझन जोरात असताना प्रायमरी मार्केटमध्ये दोन मोठे IPO दमदार एंट्री घेण्याच्या तयारीत आहेत. तब्बल ₹27,000 कोटींपेक्षा जास्त किमतीचे दोन आयपीओ येत्या आठवड्यात लॉन्च होत आहेत. मात्र, अनेकांना प्रश्न पडलाय की, मंदावलेला बाजार एवढ्या मोठ्या आकाराचे IPO पचवू शकेल का?
दोन दिग्गज कंपन्यांचे IPO
पुढील आठवड्यात टाटा कॅपिटल आणि LG इलेक्ट्रॉनिक्स अनुक्रमे 15,500 कोटी आणि 11,600 कोटी रुपयांचे IPO आणत आहेत. एकूण आकार 27,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. भारताच्या प्रायमरी मार्केटमध्ये इतक्या मोठ्या साइजचे दोन IPO एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल.
मेगा IPO चा इतिहास फारसा चांगला नाही
इतिहास पाहता, मोठ्या IPO नी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला नाही. एचडीबी फायनान्शियलचा 12,500 कोटींचा IPO लिस्टिंगच्या दिवशी 14% वाढला, पण सध्या इश्यू प्राइसपेक्षा फक्त 4% वर आहे. NTPC ग्रीन एनर्जीचा 10,000 कोटींचा IPO आजही 108 रुपयांच्या इश्यू प्राइसखाली आहे. पेटीएमचा 18,000 कोटींपेक्षा जास्तीचा IPO आज इश्यू प्राइसच्या 50% नी खाली आहे. LIC चा 21,000 कोटींचा IPO 949 रुपयांच्या प्राइसवर आला होता, मात्र सध्या 900 रुपयांच्या आसपास आहे. यामुळेच मोठ्या IPO वर गुंतवणूकदार फारसे आकर्षित होत नाहीत, असे दिसते.
यशस्वी उदाहरणे
दरम्यान, काही मेगा IPO ने चांगला परतावा दिला आहे. यामध्ये ह्युंदाई मोटरचा 27,870 कोटींचा IPO 1960 रुपयांच्या प्राइसवर आला होता, जो सध्या 2500 रुपयांवर व्यवहार करतो. याशिवाय, स्विगीचा 11,327 कोटींचा IPO 390 रुपयांच्या प्राइसवर होता, जो सध्या 415 रुपयांच्या आसपास आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
SBI सिक्युरिटीजचे सनी अग्रवाल यांच्या मते, बहुतेक IPO पूर्ण किमतीवर येत आहेत, त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांसाठी किंमत-आकर्षण कमी राहते. त्यामुळे मोठ्या IPO ची गर्दी प्रायमरी व सेकंडरी मार्केटवर दबाव आणू शकते. प्रणव हल्दिया (प्राइम डेटाबेस ग्रुप) यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, IPO मुळे सेकंडरी मार्केटमधली लिक्विडिटी कमी होत नाही. कोविडनंतरच्या 5 वर्षांत IPO ची संख्या वाढली असली तरी बाजार चारपट वाढला आहे.
शेअर बाजाराची अग्निपरीक्षा
येत्या आठवड्यातील हे दोन मेगा IPO (टाटा कॅपिटल – 15,500 कोटी, LG इलेक्ट्रॉनिक्स – 11,600 कोटी) बाजाराची खरी कसोटी ठरणार आहेत. प्रश्न इतकाच की, सुस्त बाजारात गुंतवणूकदार एका आठवड्यात 27,100 कोटी रुपये उभारू शकतील का?
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)