Share Market Investment: संमिश्र जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ९०० अंकांनी घसरला. सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरून ७६,२९४ वरून ७५,३८८ वर तर निफ्टी ५० १ टक्क्यानं घसरून २२,७९८ वर पोहोचला. मिड कॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटची कामगिरी खालावली असून बीएसईमिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत घसरले.
८ लाख कोटींचं नुकसान
बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४०८.५ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४००.५ लाख कोटी रुपयांवर आलंय. त्यामुळे गुंतवणूकदारांचं एका दिवसात सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पाहूया शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं कोणती?
१. नव्या आयकर विधेयकापूर्वी खबरदारी
नव्या प्राप्तिकर विधेयकापूर्वी ची खबरदारी हे सध्याच्या बाजारातील विक्रीमागील एक कारण असू शकतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जाहीर केलेलं नवं आयकर विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. नव्या आयकर विधेयकांतर्गत वित्तीय रोख्यांवर अधिक कर लावण्याची शक्यता आहे.
२. यूएस फेड अध्यक्षांचं वक्तव्य
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मंगळवारी व्याजदरांबाबत रिझर्व्ह बँकेच्या सावध भूमिकेला दुजोरा दिल्यानंतर यावर्षी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात आणखी कपातीच्या शक्यतांना ब्रेक लागला. नजीकच्या भविष्यात व्याजदरात कपात करण्याचा कोणताही दबाव मध्यवर्ती बँकेवर नाही कारण महागाई जास्त आहे आणि रोजगार बाजार मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलं.
३. एफपीआयची विक्री
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आक्रमकपणे भारतीय शेअर्सची विक्री करीत आहेत. ऑक्टोबरपासून आतापर्यंत त्यांनी २.८ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीचे भारतीय शेअर्स विकले आहेत. भारतीय शेअर बाजाराचं वाढतं मूल्यांकन, घसरत चाललेला विकासदर, कमकुवत तिमाही निकाल, रुपयाचं अवमूल्यन, अमेरिकी डॉलरचे मजबुतीकरण आणि रोखे उत्पन्नात झालेली वाढ अशा अनेक कारणांमुळे भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात परकीय निधी बाहेर पडला आहे.
४. ट्रम्प टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं शुल्क हे सध्याच्या बाजारातील विक्रीचं प्रमुख कारण आहे. टॅरिफ पॉलिसीमुळे मोठे ट्रेड वॉर होण्याची शक्यता जगभरातील बाजारपेठा चिंतेत आहेत. ट्रम्प यांच्या या टॅरिफचा फटका अनेक दिवसांपासून बाजाराला बसला आहे. मेक्सिको, कॅनडा आणि काही प्रमाणात चीन सारख्या विशिष्ट देशांना लक्ष्य करण्याऐवजी ट्रम्प यांनी उचललेले पाऊल आणि सर्व देशांमध्ये स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात शुल्काच्या दिशेनं उचललेलं पाऊल यामुळे चिंता वाढली आहे.