Front Running Case : कोरोना काळापासून तरुणांचा शेअर बाजारातगुंतवणूक करण्याचा कल वाढत चालला आहे. मात्र, यातील बहुतांश तरुणांनाही अजूनही शेअर बाजार म्हणजे सट्टाबाजार वाटत आहे. जिथे रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्न पाहिली जात आहे. टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी टीप्स दिल्या जात आहेत. अशा कुठल्याही प्रकाराला तुम्ही बळी पडले असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, नुकतेच शेअर बाजार नियामक सेबीने रोखे बाजारातील ८ संस्थांवर बंदी घातली आहे. या कारवाईवत 'फ्रंट-रनिंग' प्रकारातून कथितपणे कमावलेली ४.८२ कोटी रुपयांची रक्कम जप्त करून फ्रंट रनिंगवर पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. याआधीही फ्रंट रनिंगवरुन सेबीने कडक इशारा दिला होता.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑेफ इंडिया अर्थात सेबीने काही संस्थांद्वारे गगनदीप कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या कथित डीलची चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली आहे. सप्टेंबर २०१८ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान सेबीने ही कारवाई केली.
फ्रंट रनिंग म्हणजे काय?
फ्रंट रनिंग म्हणजे फॉरवर्ड रनिंग किंवा इनसाइडर ट्रेडिंग असेही म्हणतात. शेअर बाजारात गैरप्रकार करुन नफा कमवण्याची ही पद्धत आहे. यामध्ये मोठे गुंतवणूकदार किंवा ब्रोकर कंपनीच्या आतल्या बातम्या मिळवतात. याचा वापर करुन बेकायदेशीरपणे पैसे कमवतात. कंपनी एखादा मोठा निर्णय घेणार असल्यास हे मोठे ब्रोकर किंवा गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्समध्ये आगाऊ पोझिशन्स घेऊन ठेवतात. कंपनीशी संबंधित बातमी बाहेर आली की साहजिक शेअर वर जातो. त्यावेळी हे नफा बुकिंग करतात. अशा बेकायदेशीर कामांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते.
सेबीने काय आदेश दिलेत?
आशिष कीर्ती कोठारी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे एचयूएफ (हिंदू अविभक्त कुटुंब) यांच्यावर मोठ्या क्लायंटसोबत फ्रंट रनिंग डीलचा आरोप आहे. अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सहभागी होऊन, या संस्थांनी सेबीच्या कायद्याच्या अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ८ संस्थांना सिक्युरिटीजची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे, असा आदेश सेबीने दिले आहेत.
केतन पारेख देखील करायचा फ्रंट रनिंग घोटाळा
काही दिवसांपूर्वी सेबीने एक घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात केतन पारेख याच्यासह आणखी तिघांची नावं असल्याचं समोर आलंय. या लोकांनी अमेरिकेतील फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सच्या (FPI) ट्रेड्समध्ये गैरव्यवहार करून गुंतवणूकदारांची ६५.७७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सेबीनं त्यांचे पैसे जप्त करण्याचे निर्देश दिलेत. तसंच कारणे दाखवा नोटीस बजावली असून तिन्ही आरोपींवर बंदी घातली आहे. केतन पारेख, सिंगापूर येथील ट्रेडर रोहित साळगावकर आणि अशोककुमार पोद्दार यांनी फ्रंट रनिंगच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचं सेबीनं २ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.