Share Market Crash: शेअर बाजारात आज(९ एप्रिल) रोजी पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाल्याने बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, BSE Sensex ९३१.२५ अंकांनी घसरून ७६,६३१.६५ या नीचांकी पातळीपर्यंत पोहोचला. तर, Nifty 50 २२२.२५ अंकांनी घसरून २३,७७५.१० या स्तरावर आला.
या घसरणीमागे पश्चिम आशियातील वाढता तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाबाबत अनिश्चितता कायम असून, इस्रायककडून लेबनॉनवर करण्यात आलेल्या तीव्र हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, याआधीच्या सत्रात बाजारात जोरदार तेजी नोंदवण्यात आली होती. सेन्सेक्स २,९४६.३२ अंकांनी वाढून ७७,५६२.९० वर बंद झाला होता, तर निफ्टी ८७३.७० अंकांनी वाढून २३,९९७.३५ वर पोहोचला होता. या तेजीमागे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय, सर्व क्षेत्रांतील खरेदी आणि रुपयातील मजबुती ही कारणे होती.
मात्र, पुन्हा वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रुडचा भाव २.०९ टक्क्यांनी वाढून ९६.७३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला, तर WTI क्रुड २.७५ टक्क्यांनी वाढून ९७.०१ डॉलर प्रति बॅरल झाला. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाल्याने तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, रुपयातही कमजोरी दिसून आली. रुपया १७ पैशांनी घसरून ९२.७१ प्रति डॉलरवर आला. मागील सत्रात तो ९२.५४ वर बंद झाला होता.
आशियाई बाजारांमध्येही घसरणीचे वातावरण होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५, चीनचा एसएसई कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग हे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. मात्र, अमेरिकन आणि युरोपीय बाजार मागील सत्रात वाढीसह बंद झाले होते.
