share market crash : गेल्या २ महिन्यांपासून शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहयाला मिळत आहेत. अशा परिस्थिती काल (सोमवार) कर्नाटकमध्ये HMPV विषाणूचा रुग्ण आढळल्याची बातमी आली. काही मिनिटांत शेअर बाजार जोरात आपटला. सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे तब्बल ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत हा विषाणू कोरोनाच्या काळाप्रमाणे बाजारालाही बुडवेल की काय अशी भीती शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. दरम्यान, आज शेअर बाजारात रिकव्हरी झाली. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की अशा परिस्थितीत काय करावे जेणेकरून त्यांचा पैसा वाया जाऊ नये. आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमचे पैसे गमावण्यापासून वाचवतील.
कमकुवत अर्निंग्स ग्रोथ
जर तुम्ही शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कमकुवत कमाईच्या वाढीकडे नक्कीच लक्ष द्यावे. वास्तविक, या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या कमाईची वाढ कमकुवत दिसत आहे. या तिमाहीत ती केवळ ५ टक्के मर्यादित असू शकते. याआधी दुसऱ्या तिमाहीतही बहुतांश कंपन्यांचे निकाल फारसे चांगले नव्हते. याशिवाय एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा परिणाम शेअर बाजारावरही होईल.
उच्च मूल्यांकनाचा दबाव
कमाईची वाढ कमकुवत राहिल्यास मूल्यांकनाची स्थितीही बिघडेल. गेल्या ४ वर्षातील कमाईच्या वाढीमुळे, शेअर्सच्या किमती बाजारात गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा कमाईची वाढ आगामी काळात कमकुवत होईल, तेव्हा त्याचा परिणाम शेअरच्या किमतीवरही होईल. नुकताच ब्लूमबर्गचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये NSE ५०० पैकी २७३ समभागांचा P/E मल्टिपल २५ च्या वर असल्याचे म्हटले आहे. आता अशा परिस्थितीत दोन घटना घडू शकतात. त्रैमासिक निकाल चांगले असल्यास शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. परंतु, निकाल खराब असल्यास शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते.
परकीय गुंतवणूकदारांची शेअर बाजाराकडे पाठ
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, मार्च २०२१ मध्ये भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा २०.९५ टक्के होता. आज ते १६.१ टक्क्यांवर आले आहे. याशिवाय भारतात एचएमपीव्हीच्या आगमनाने परदेशी गुंतवणूकदारही चिंतेत पडले आहेत. येत्या काळात या विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढला, तर बाजार आणखी घसरण्याची शक्यता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तज्ञांचे मत आहे की एचएमपीव्ही कोरोनासारखा धोकादायक नाही. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूकदार असाल तर यावेळी वेट अँड वॉच अशा स्थितीत रहावे. मोठी गुंतवणूक करणे टाळा.
डिस्क्लेमर : यामध्ये शेअर मार्केट विषयी माहिती देण्यात आलेली आहे. यात कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.